महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात-
रामें मांडिला शतनिष्कपण । विदर्भें नेला तो जिंकोन।
पुढतीं सहस्र निष्क सुवर्ण । राम घेऊन क्रीडतसे ।
तोही रुक्मि जिंकूनि नेतां । अयुत निष्क झाला धरिता ।
तोही डाव रुक्मी हरितां । रेवतीकान्ता नृप हंसती ।
बळभद्रातें कालिङ्ग नृपति । दांत दावूनि हांसतां कुमति ।
उच्चस्वरें हास्य करिती । त्या अनुकरती अपरती ।
तें न गणूनि हलायुध । विदर्भातें म्हणे सावध ।
आपणा म्हणविसी अक्षकोविद । तरी धर्मता शुद्ध पण जिंकें ।
बलरामांनी अगोदर शंभर, नंतर हजार व त्यानंतर दहा हजार मोहरांचा डाव लावला. ते सर्व रुक्मीने जिंकले. तेव्हा कलिंगराजा दात विचकावून, खदखदा हसून बलरामांची खिल्ली उडवू लागला. बलरामांना ते सहन झाले नाही.
हें ऐकूनि रुक्मी म्हणे । लक्ष निष्क म्यां धरिले पणें ।
तुम्हीं धर्मता जिंकूनि नेणें । अक्ष ढाळणें झडकरी ।
अक्ष ढाळूनि तत्क्षणें । पण जिंकिला संकर्षणें ।
कपटाश्रयें त्या विदर्भ म्हणे । म्यां जिंकिला पण आतां ।
सर्व प्रेक्षक सभासद । साक्ष देती भूपाळवृंद ।
तुम्ही धर्मता अक्षकोविद । मिथ्या वाद करूं नका ।
ऐसा ऐकूनि कुटिल शब्द । क्रोधें बळराम झाला क्षुब्ध ।
आंगीं वीरश्रीचा मद । प्रळयीं क्षारोद ज्यापरी ।
यानंतर रुक्मीने एक लक्ष मोहरांचा पण लावला. तो बलरामांनी जिंकला. परंतु रुक्मी लबाडीने म्हणू लागला की, मी जिंकलो.
नातरी अमावास्येच्या दिवसीं । प्रबळ भरतें महोदधीसी ।
त्याहूनि बळराममानसीं । क्रोध विशेष प्रज्वलला ।
क्षोभें आरक्त झाले नयन । दहा कोटि घेतला पण ।
अक्ष धर्मता ढाळून । रामें तो पण जिंकिला ।
न्यर्बुद म्हणिजे दहा कोटि । ग्लह जिंकितां राम जगजेठी ।
रुक्मी मुमूर्ष दुर्मति कपटी । बोलिला गोठी ते ऐका ।
कपटाश्रयें बोले बोला । म्हणे म्यां हा ग्लह जिंकिला।
प्रेक्षक नृपवर्ग बैसला । तुम्हां आम्हांला साक्षी हा ।
यावर बलराम खवळला. त्याचे डोळे स्वभावत:च लाल होते. क्रोधामुळे ते आणखीनच लाल झाले. आता त्यांनी दहा कोटी मोहरांचा पण लावला. यावेळीसुद्धा द्यूताच्या नियमानुसार बलरामाचाच जय झाला. परंतु रुक्मीने कपटाने म्हटले, ‘मी जिंकलो! या विषयातील तज्ञ याचा निर्णय करू देत.’
यथार्थ साक्षी हे बोलत । ऐसी रुक्मी वदतां मात ।
चमत्कार अकस्मात । जाला तेथ तो ऐका ।
गगनीं वाचा अशरीरी । बोलती झाली दीर्घ स्वरिं ।
रामें जिंकिला ग्लह निर्धारिं । धर्मवैखरी हे जाणा ।
कपटें रुक्मी बोले मृषा । धरूनि नृपांचा भरंवसा ।
लज्जा न वाटे गतायुषा । सद्यचि नाशा पावेल ।
त्यावेळी आकाशवाणी झाली की, ‘नियमानुसार बलरामांनीच हा डाव जिंकला आहे. रुक्मी खोटे बोलतो.’
Ad. देवदत्त परुळेकर








