सरकारचे संसदेत वक्तव्य : अभ्यास सुरु असल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सेतू असल्याचे निश्चित पुरावे नाहीत, असे वक्तव्य केंद्र सरकारने संसदेत केले आहे. भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. उपग्रहीय प्रतिमांच्या आधारे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये चुनखडीने बनलेला मार्ग अस्तित्त्वात असल्याचे म्हणता येते. तथापि, तो रामसेतूच आहे किंवा नाही यासंबंधी निश्चित मत व्यक्त करता येणार नाही. तज्ञांकडून याचा अभ्यास सुरु आहे, अशी माहिती सरकारने दिली.
तंत्रज्ञानाच्या आधारे सेतूसदृश काही भाग येथे आढळून येतात. हा सेतू तुकडय़ा तुकडय़ांमध्ये असल्याचे दिसते. त्याच्या एका बाजूला बेट आणि चुनखडीच्या दगडांचे ढीग दिसून येतात. रामसेतूचे निर्माण कार्य 18 हजार वर्षांपूर्वी झाले होते. त्याची लांबी 56 किमी होती. तथापि, सध्या तेवढा भाग शिल्लक राहिलेला नसल्याचे दिसून येते. सरकारने तज्ञांच्या माध्यमातून या सेतूसदृश मार्गाचा अभ्यास सुरु केला असून तज्ञांनी अहवाल दिल्यानंतर सत्य परिस्थिती स्पष्ट होईल. त्यानंतर सरकार निवेदन देईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अवकाश विभागाकडून संशोधन
रामसेतूच्या मार्गाचे संशोधन अवकाश अभ्यास विभागाकडून केले जात आहे. रामसेतू ही पुरातन निर्मिती असल्याने त्याचा शोध घेण्यामध्ये सरकारला काही मर्यादा पडत आहेत. या मर्यादांच्या बंधनातच संशोधन करण्यात येत आहे. असे म्हटले जाते की, 15 व्या शतकापर्यंत या मार्गाने तामिळनाडूतील रामेश्वरम येथून श्रीलंकेच्या मन्नार द्विपापर्यंत चालत जाता येत होते. तथापि, नंतर समुद्राची पातळी वाढल्याने सेतू पाण्याखाली गेला. तेव्हापासून त्याचा उपयोग केला जात नाही. या म्हणण्यात तथ्य किती याचाही शोध घेतला जात आहे.
मनमोहनसिंग सरकारचा निर्णय
2005 मध्ये मनमोहनसिंग सरकारने या सेतूसदृश रचणेचा काही भाग पाडून जहाजांना प्रवासासाठी वाट करुन देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, या प्रकल्पाला मोठा विरोध झाला. यामुळे ही योजना सोडून द्यावी लागली. ही सेतूसदृश रचणा तोडू नये असे काही वैज्ञानिकांचेही मत आहे. ही रचना फोडल्यास मोठे नैसर्गिक संकट ओढवू शकते. कारण हा सेतू टेक्टॉनिक प्लेटवर आहे, असे त्यांचे मत आहे. यासंबंधी मनमोहनसिंग सरकारने सर्वोच्चा न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र नंतर ते मागे घेण्यात आले. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे.