प्रतिनिधी / चिपळूण
रामपूर प्राथामिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केल्यानंतर यावर कार्यवाही सुरू झाली आहे. मंगळवारी शासकीय रुग्णालय डॉक्टरांच्या पथकाने रामपूर येथे जाऊन प्रत्यक्ष रुग्णालयाची पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी हे आरोग्य केंद्र अत्यंत योग्य असल्याचे मत या पथकाचे असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आम्ही पाठवणार असल्याची माहिती पथकातील डॉक्टरांकडून देण्यात आली.
रामपूर येथील आरोग्य केंद्राचे नुकतेच 2.50 कोटी इतके खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभी असून हे आरोग्य केंद्र प्रस्तावत राष्ट्रीय महामार्ग गुहागर ते चिपळूण या मार्गावर आणि या दोन्ही तालुक्यांच्या मध्यावर आहे. या दोन्ही तालुक्यांतील रूग्णांना उपचारासाठी चिपळूण येथील कामथे या रूग्णालयात जाण्यासाठी गुहागर येथून सुमारे 60 कि. मी.चा प्रवास व रामपूर भागातील रूग्णांना सुमारे 25 कि. मी.चा प्रवास करावा लागतो.
परंतु रामपूर या ठीकाणी असणाऱ्या आरोग्य केंद्रास ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळाल्यास पंचक्रोशी तसेच गुहागर तालुक्यातील अनेक रूग्णांना याचा फायदा होईल व प्रवासवेळेत बचत झाल्याने रूग्णांना तातडीचे उपचार मिळतील अशा आशयाचे पत्र आमदार जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यासह या विभागाच्या संचालकाना पाठवले होते.









