अन्यथा 15 दिवसांनंतर रास्तारोकोचा इशारा : विविध संघटनांतर्फे जोयडा तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी / जोयडा
रामनगर जनतेवर तीव्र अन्याय झाला आहे. सुपा विस्थापित गाव म्हणून रामनगरकडे पाहण्यात येते पण गावात पिण्याच्या पाण्याची समस्या व शेतीला पाणीपुरवठा करण्यात सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. शिवाय बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या एक वर्षांपासून बंद आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्ग 4 ए चे काम त्वरित सुरू करावे अन्यथा 15 दिवसानंतर याविरोधात आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल, असा स्पष्ट धमकी वजा इशारा रामनगर व दांडेली समग्र अभिवृद्धी आंदोलन समिती व जोयडा येथील विविध संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जोयडा तहसीलदारांद्वारे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
सुपा विस्थापितांना रामनगरमध्ये येऊन 37 वर्षे झाली. विस्थापित करताना तत्कालिन सरकारने विस्थापितांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पुरवठा करू, शेतकऱयांच्या मुलांना केपीसी (कर्नाटक विद्युत निगम) मध्ये प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देऊ, असे आश्वासन दिले होते पण अद्यापही रामनगर विस्थापितांकडे दुर्लक्ष झाले आहे. सरकार पाण्यासाठी निधी मंजूर करते पण जनतेला पाणीच मिळत नाही. कोटी रुपये खर्च करण्यात येतात पण रामनगरमधील जनतेची पाण्याची समस्या काही सुटलेली नाही. तालुका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मात्र आलेल्या पैशावर डल्ला मारून गप्प बसत आहेत. याकडे जिल्हा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
बेळगाव-गोवा महामार्गाचे काम एक वर्षांपासून बंद आहे. रामनगर ते खानापूर या 25 कि. मी. रस्त्याची चाळण झाली आहे. वाहने खड्डय़ात अडकून पडत आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर खास करून गरोदर महिला, लहान मुले व वृद्धांना मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यांचा उपचारासाठी आर्थिक खर्च वाढलेला आहे. ही समस्या 15 दिवसांत न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते कृष्णा दुगाणे, काळी ब्रिगेडचे जिल्हा संचालक रवी रेडकर, जोयडा व्यापारी संघटनेचे प्रमुख खाजी, दांडेली तालुका समग्र अभिवृद्धी आंदोलन समतीचे अध्यक्ष अक्रम खान, ऍड. सुनील देसाई, ऍड. गडपन्नवर, संदीप मिराशी, मल्हार राणे, विठोबा चौधरी, संतोष देसाई, रमाकांत देसाई, शंकर देसाई, नामदेव पाटील, संजय शेटकर, मारुती दुगाणे, व्ही. जी. देसाई, विनायक परब, सदानंद सुधीर, यशवंत देसाई, दयानंद देसाई, विशाल देसाई, सोमा मिराशी, विठोबा पाटील, शिवानंद गगरी आदी उपस्थित होते.
40 खेडय़ांतील नागरिक विस्थापित
सुपा धरण गणेशगुडी येथे बांधल्यानंतर सुमारे 40 खेडय़ांतील नागरिकांना विस्थापित म्हणून रामनगर येथे वसविण्यात आले. सुपा व परिसरातील शेतकरी त्यावेळी वर्षातून दोन पिके व इतर भाजीपाल्याचे उत्पादन घेत होते. यावेळी त्यांचे राहणीमान उत्तम होते पण रामनगरात विस्थापित केल्याने त्यांची परिस्थिती कठिण होऊन बसली आहे. हा प्रदेश खडकाळ जमीन व पाण्याची कमतरता आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. येथील जनतेला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, ही प्रमुख मागणी गेल्या 35 वर्षांपासून होत आहे.









