बापट गल्ली व्यावसायिक-रहिवांशाचा आक्षेप, पूर्ववत बांधण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
रामदेव गल्ली भंगीबोळातील स्वच्छतागृह हटविण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली होती. पण नागरिक व व्यावसायिकांना गरजेची असल्याने हटविण्याची कारवाई मनपाने केली नव्हती. मात्र नगरसेवकांच्या तक्रारीमुळे सदर स्वच्छतागृह मनपाने हटविले असून याला नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. याठिकाणी स्वच्छतागृह पूर्ववत बांधण्यात यावे, अशी मागणी बापट गल्लीतील रहिवासी व व्यावसायिकांनी केली आहे.
रामदेव गल्ली भंगीबोळातील स्वच्छतागृहामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छतागृह हटविण्यात यावे, अशी मागणी काही व्यावसायिकांनी यापूर्वी केली होती. पण स्वच्छतागृह हटविण्यात आल्यानंतर बाजारपेठेत येणारे नागरिक आणि व्यावसायिकांना नाहक त्रास होवू शकतो. त्यामुळे स्वच्छतागृह हटविण्यास आक्षेप घेण्यात आला होता.
मात्र स्वच्छतागृह हटविण्याची मागणी पुन्हा काही व्यावसायिकांकडून नगरसेवकांकडे करण्यात आली होती. त्यामुळे नगरसेवकांच्या सुचनेनुसार येथील स्वच्छतागृह हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने सोमवारी दुपारी करण्यात आली. स्वच्छतागृह हटविण्याची कारवाई केली असल्याची माहिती बापट गल्लीतील रहिवांशाना आणि व्यावसायिकांना मिळाल्याने याला आक्षेप घेतला. तसेच याबाबतचा जाब मनपाच्या अधिकाऱयांना विचारला, असता नगरसेवकांच्या तक्रारीवरून स्वच्छतागृह हटविण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सागितले. वास्तविक, बापट गल्ली परिसरातील व्यावसायिकांना तसेच बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना सदर स्वच्छतागृह सोयीचे आहे. त्यामुळे हटविलेल्या ठिकाणी नविन स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी केली.
तक्रारीमुळे हटविले : सचिन कांबळे -मनपा सहाय्यक कार्यकारी अभियंते

बापट गल्ली पार्किंग तळ आणि भंगीबोळात पेऍण्डयुज स्वच्छतागृह असल्याने सदर स्वच्छतागृह हटविण्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार स्वच्छतागृह हटविण्यात आल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांनी दिली.
स्थानिकांना विश्वासात न घेता कारवाई केली : भाऊ किल्लेकर

बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना सदर स्वच्छतागृह सोयीचे होते. त्यामुळे स्वच्छतागृह हटविण्यास आमचा आक्षेप आहे. बापट गल्लीतील व्यावसायिक आणि नागरिक स्वच्छतागृहाचा वापर करीत असतात. पण महापालिकेच्या अधिकाऱयांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता कारवाई केली आहे. महापालिकेने सदर स्वच्छतागृह पूर्ववत बांधून द्यावे, अशी मागणी भाऊ किल्लेकर यांनी केली.
पैशाची देवाणघेवाण झाली : सुनिल मुरकुटे

स्वच्छतागृह नसल्यास नागरिक गटारीत लघुशंका करतात. त्यामुळे परिसरातील गटारीमधून दुर्गंधी पसरते. त्यामुळे स्वच्छतागृह हटविण्यास यापूर्वीदेखील विरोध केला होता. पण सोमवारी सदर स्वच्छतागृह हटविण्याची कारवाई करून व्यावसायिक व नागरिकांच्या गैरसोयीत भर टाकली आहे. स्वच्छतागृह हटविण्यास विरोध असून सदर स्वच्छतागृह हटविण्यासाठी पैशाची देवाणघेवाण झाल्याचा आरोप सुनिल मुरकुटे यांनी केला.









