समाज कल्याण खात्याच्या विद्यार्थिनी वसतिगृहामधील घटना : सरकारी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर
वार्ताहर /रामदुर्ग
समाज कल्याण खात्याच्या विद्यार्थिनी वसतिगृहामधील 9 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विद्यार्थिनींना पोटदुखी व उलटय़ा सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वसतिगृहामध्ये 100 विद्यार्थिनी आहेत. मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर 9 विद्यार्थिनींना पोटदुखी व उलटय़ा, जुलाब सुरू झाले. यानंतर 9 पैकी 5 विद्यार्थिनींना सरकारी रुग्णालयात तर 4 विद्यार्थिनींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे.
जेवणातून विषबाधा झालेल्या विद्यार्थिनी एका ठिकाणी एग्ग राईस खाल्ल्याने ही समस्या झाल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले. तर इतर काही विद्यार्थिनींच्या मते वसतिगृहातील स्वयंपाक कर्मचारी चांगला आहार बनवत नसल्याचा आरोप केला आहे. तहसीलदार मल्लिकार्जुन हेगन्नवर यांनी रुग्णालयाला आणि वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थिनींची विचारपूस करत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थिनींनी स्वयंपाक कर्मचाऱयांविरोधात तक्रार केली. त्यावेळी तहसीलदारांनी स्वयंपाक कर्मचारी बदलण्याची सूचना केली. घटनेची माहिती मिळताच बेळगाव नागरिक हक्क निर्देशनालयाचे इन्स्पेक्टर बी. एस. तळवार यांनी रुग्णालय व वसतिगृहाला भेट देऊन माहिती घेतली.









