वार्ताहर/ रामदुर्ग
कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱया वाहन चालक व मालकांनी रस्ता संचार नियमांचे पालन करावे. रस्ता संचार नियम हे केवळ तुमच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे आपल्यामुळे इतरांना समस्या होणार नाही, याची काळजी घेऊन सुरक्षिरित्या वाहन चालवावे, असे आवाहन धनलक्ष्मी कारखान्याचे अध्यक्ष मलण्णा यादवाड यांनी केले. तालुक्यातील खानपेठ येथील धनलक्ष्मी साखर कारखाना आवारणात पोलीस खात्याच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऊस वाहतूकदार ट्रक्टर चालकांसाठी आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.
कटकोळ पीएसआय इरणा रित्ती म्हणाले, वाहन चालवत असताना वाहन व चालकाची आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे नेहमी ठेवावीत. वाहनाच्या पुढच्या व मागच्या बाजूला रेडियम स्टीकर लावावे, ऊस भरल्यानंतर वाहन वेगाने चालवू नये, असे आवाहन त्यांनी केले. रामदुर्ग पीएसआय नागनगौडा कट्टमनीगौड्ड म्हणाले, वाहनाचे पासिंग व इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.
अन्यथा एखाद वेळेस अपघात झाल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चालकांनी आवश्यक कागपत्रे आपल्याकडे ठेवावीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी एआरटीओ धर्मराज पवार, पॅरी शुगर्स कंपनीचे जी. एम. रविंद्र देसाई आदी मान्यवरांसह पोलीस कर्मचारी, मालक, चालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









