बांधकाम खात्याकडून 50 कोटी राखीव : मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर येथे 9 एकर 20 गुंठे जागेत सुसज्ज जिल्हा क्रीडांगण उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम खात्याकडून 50 कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. सध्या 10 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
सुवर्णविधानसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ व क्रीडा मंत्री बी. नागेंद्र यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. शहरातील रामतीर्थनगर येथे 9 एकर 20 गुंठे जागेत हे मैदान उभारण्यात येणार आहे. याबरोबरच अतिरिक्त सहा एकर जागा संपादित केली जाणार आहे. अशाप्रकारे एकूण 15 एकर जागेत मैदान उभारले जाणार आहे. यामध्ये क्रीडापटूंसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. क्रीडांगणाच्या उभारणीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यासाठी संबंधित खात्याकडून आवश्यक ती माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शहरामध्ये क्रीडापटूंसाठी जिल्हास्तरीय क्रीडा मैदानाची आवश्यकता असल्याची माहिती क्रीडामंत्री बी. नागेंद्र यांना दिली. यासाठी लवकरच काम हाती घेण्यात यावे, क्रीडा मैदान उभारण्याकरिता आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यासाठी कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याबरोबरच क्रीडा खात्याकडूनही मैदानासाठी निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार राजू सेठ यांनीही मैदानाची आवश्यकता असल्याचे मंत्र्यांना पटवून दिले. यावेळी युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते व मागासवर्गीय कल्याण खात्याचे मुख्य कार्यदर्शी मंजुनाथ, आयुक्त शशिकुमार आदी उपस्थित होते.









