प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज पळविण्यात आला आहे. शनिवारी चोरीची ही घटना उघडकीस आली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सोमनिंग महादेवप्पा होंगल यांनी फिर्याद दिली आहे. कामानिमित्त शुक्रवार दि. 25 मार्च रोजी आपल्या घराला कुलूप लावून ते परगावी गेले होते. शनिवारी गावाहून परतले, त्यावेळी दरवाजा उघडा होता. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. तातडीने माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून सौमनिंग यांच्या घरात प्रवेश केला आहे. कपाटातील 4 लाख 76 हजार 200 रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कपाटातील 1 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम व 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. लोकवस्तीतील बंद घरांना खासकरून उपनगरातील घरांना चोरटय़ांनी लक्ष्य बनविले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.









