प्रतिनिधे/ बेळगाव
बुडाच्यावतीने विविध विकासकामे राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. साडेपाच कोटीचा निधी खर्च करून रामतीर्थनगर येथील बुडाच्या जागेत समाजभवन उभारण्यात येणार आहे. तसेच तीन कोटी खर्चून क्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव मंजुरीकरिता राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. यामुळे प्रस्ताव कागदावरच राहिला आहे.
रामतीर्थनगर परिसरात बुडाने रहिवासी वसाहत निर्माण केली असून याठिकाणी बुडाच्या खुल्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागावर व्यापारी संकुल आणि समाजभवन उभारण्याचा प्रस्ताव आहे. बुडाला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परिसरात समाजभवनच्या उभारणीकरिता बुडाने साडेपाच कोटीचा आराखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव राबविण्याकरिता निधीची तरतूद करून मंजुरी देण्यात आली. तसेच रामतीर्थ नगरमध्ये क्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. याकरिता तीन कोटी निधी मंजूर करून हा प्रकल्प राबविण्यास बुडाच्या बैठकीत हिरवा कंदील दर्शविण्यात आला. पार्किंग सुविधा, राहण्याची व्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा युक्त इमारती उभारण्यात येणार आहेत. यामुळे रामतीर्थनगर येथे बुडाच्यावतीने दोन्ही प्रस्ताव राबविण्याकरिता साडेपाच कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर प्रस्तावाला अर्थ विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याकरिता कॅबिनेटची मंजुरी आवश्यक आहे.
अलिकडे झालेल्या पावसाळी अधिवेशनात रामतीर्थनगरमध्ये 29 कोटीची विकासकामे राबविण्याकरिता कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली. पण व्यापारी संकुल आणि समाज भवन उभारण्याकरिता मंजुरी देण्यात आली नाही. बुडाने खुल्या जागाची विक्री केली असल्याने मिळालेल्या निधीमधून व्यापारी संकुल आणि रामतीर्थ नगरमध्ये विकासकामे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पण शासनाकडून देण्यात आली नसल्यामुळे हा प्रस्ताव कागदावर राहणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









