डाव्या पायाच्या दुखापतीचा फटका, अमेरिकन ग्रँडस्लॅममध्येही खेळणार नाही
नचा अव्वल दर्जाचा टेनिसपटू राफेल नदालने पायाच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगामात आपण खेळू शकणार नसल्याचे शुक्रवारी जाहीर केले. या निर्णयामुळे तो पुढील महिन्यातील अमेरिकन ग्रँडस्लॅममध्ये समाविष्ट नसेल, हे निश्चित झाले. नदालने आपल्या ट्वीटर हँडलवरुन या निर्णयाची घोषणा केली.
सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नदालला याच महिन्यात वॉशिंग्टनमधील स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. नंतर सिनसिनॅटी व कॅनेडियन ओपन स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागली. आता पायाची दुखापत आणखी चिघळतच राहिल्याने त्याला पूर्ण हंगामात खेळू शकणार नसल्याचे जाहीर करावे लागले.
‘मागील जवळपास वर्षभरापासून मी पायाचे दुखणे सहन करत आहे आणि यावर मार्ग काढण्यासाठी पुरेशा विश्रांतीची सक्त गरज आहे. पुढील काही वर्षे खेळत राहायचे असेल तर आता ब्रेक घेणे गरजेचे आहे’, असे नदाल आपल्या निर्णयाविषयी सविस्तर बोलताना म्हणाला. ‘पुरेशी विश्रांती घेतली तर ताज्या दमाने पुन्हा कोर्टवर उतरता येईल, याची मला खात्री आहे आणि माझे त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित असेल’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
नदालचा महान प्रतिस्पर्धी व 20 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर देखील यंदाच्या अमेरिकन ग्रँडस्लॅममधून बाहेर फेकला गेला आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली असल्याने तो बाहेर आहे. नदाल व फेडरर हे हार्डकोर्टवरील महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी न होण्याची ही सलग दुसरी वेळ असेल. गतवर्षी नदालने कोव्हिडच्या चिंतेमुळे तर फेडररने शस्त्रक्रियेमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. यंदाची अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा दि. 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.









