प्रतिनिधी/ सातारा
नागरिक आतुरतेने वाट पहात असलेला रानमेवा अखेरीस बाजारपेठेत दाखल झाला आहे. आंबट, गोड, तुरट अशा चवीचा रानमेवा खाण्याची मजाच काही और असते. करवंद, धामणं, जांभळे, आंबोळय़ा, तित्तु, बोरं, आंबा आदींचा समावेश या रानमेव्यात असतो. पण आंबा, फणस आणि करवंद या पलीकडचा रानमेवा हल्लीच्या पिठीला माहित नसतो आणि तो खाल्लाही जात नाही. रानमेव्यातल्या प्रत्येक फळाचं स्वतःचं असं वैशिष्टय़ आहे. हा रानमेवा गुणकारीतर आहेच. पण त्याची चव मनाला तृप्त करणारी आहे.
सोमवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या बाहेर एक महिला आंबोळय़ा विकण्यासाठी बसली असता अवघ्या काही तासातच तिने विक्रीसाठी आणलेल्या आंबोळय़ाची टोपली रिकामी झाली 20 रूपयाला एक माप या दराने ही महिला याची विक्री करत होती. तर नागरिकांनी विशेषतः महिला वर्गांनी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
मागील वर्षी लॉकडाऊन असल्याकारणाणे जंगल भागात मिळणारा हा रानमेवा बाजारपेठेत विक्रीस आलाच नव्हता. त्यामुळे नागरिकांना याची चव चाखताच आली नाही. यंदा मात्र परिस्थिती काहीशी सुरळीत झाली असल्याने आता हा रानमेवा बाजारपेठेत दाखल होताना दिसत आहे.








