प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ते रानबांबुळी या मालवणकडे जाणाऱया रस्त्यावरील जिल्हा रुग्णालय येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
जिल्हा मुख्यालय ते रानबांबुळी मार्गे मालवण हा रस्ता मालवणकडे जाण्यासाठी सोयीचा व जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. कोरोना काळात तर या रस्त्यावरून कोरोनाचे पेशंट घेऊन येणाऱया रुग्णवाहिका व इतर वाहने यांची मोठी रहदारी असते. अशा प्रमुख रस्त्यावर जिल्हा रुग्णालय शेजारी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. आगामी पावसाळय़ाचा विचार करता या रस्त्यावरून कोरोना रुग्णांची वाहतूक करणे अवघड होणार आहे. जिल्हा मुख्यालयात तसेच जिल्हा रुग्णालयात येणाऱया नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मुख्यालय येथील रस्त्यात खड्डे पडूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावरून नेहमीच वरि÷ अधिकारी, मंत्री प्रवास करीत असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









