चिपळूण / प्रतिनिधी
केवळ सौंदर्य नव्हे तर बौध्दिक चातुर्य, कर्तुत्व, वर्क्तृत्व या कलागुणांवर आधारीत ‘झी मराठी’ वाहिनीची संक्रांत क्वीन स्पर्धा मंगळवारी चिपळूणमध्ये पार पडली. या स्पर्धेत शेवटपर्यंत प्रत्येक फेरीत आपले कलाकौशल्य टिकवून झी मराठी संक्रांत क्वीन मान चिपळूणच्या राधा दाते यांनी आपल्या शिरपेचात रोवला. तर फर्स्ट रनरअप सखी थरवळ तर सेंकंड रनरअप होण्याचा मान सुप्रिया गुरव यांनी मिळवला.
येथील युनायटेड हायस्कूलच्या मैदानावर झी मराठी संक्रांत क्विन कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी चांगला रंगला. या स्पर्धेसाठी लोकप्रिय दैनिक ‘तरूण भारत’ ने माध्यम प्रायोजकची जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेसाठी झी मराठी वाहिनीवरील ‘लागिर झाल’ फेम शिवानी बावकर (शितली) व अभिनेता चेतन वडनेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही कलाकारांच्या उत्कृष्ट निवेदनाने या संक्रांत क्वीन स्पर्धेला चांगली रंगत आणली.
गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनी रसिकांसाठी सातत्याने दर्जेदार कलाकृतींचा नजराणा सादर करत आली आहे. मकरसंक्रांतीनिमित्त चिपळूण मधील विवाहित महिलांसाठी या वाहिनीने झी मराठी संक्रांत क्विनचे आयोजन केले. या माध्यमातून सौंदर्य, चातुर्य आणि कर्तुत्व सर्वांसमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली महिला स्पर्धकांना मिळाली.
झी मराठी संक्रांत क्वीन या स्पर्धेसाठी 14 जणींची अंतिम निवड करण्यात आली होती. मंगळवारी या 14 जणींमध्ये स्पर्धा अगदी अटीतटीची झाली. प्रेक्षकांनीही या स्पर्धकांना टाळ्यांच्या गजरात चांगले प्रोत्साहन दिले.
रॅम्प वॉक ही या स्पर्धेची पहिली फेरी होती. विशेष म्हणजे अगदी 28 व्या वर्षापासून ते 55 वर्षांपर्यत वयोगटातील महिला अगदी उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या या 14 जणींनी सुंदर असे रॅम्प वाॅक केले. यासाठी कोरिओग्राफर गणेश राऊत आणि सचिन तांबे यांनी मेहनत घेतली होती.
यानंतर दुसरी फेरी कलाविष्कार फेरी घेण्यात आली, ही फेरी चांगलीच दाद मिळवून गेली. त्येक स्पर्धकांनी आपल्या कौशल्यापमाणे आविष्कार सादर केला. विशेषत: महिलाशक्तीचे प्रबोधन करणारे पोवाडा, एकपात्री अभिनय सादर केले. काही स्पर्धकांनी विविध मराठी गाण्यांवर चांगला ठेका धरला, काहींनी विनोदी किस्से सादर केले.
या फेरीनंतर 14 जणींमधून 7 स्पर्धकांची निवड करण्यात आली. 7 स्पर्धकांना पतंग गेम 1 मिनिटात खेळायचा होता यामधून तीन स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
तिसरी अंतिम फेरी पश्न उत्तरांची होती. परिक्षक मीरा पोतदार, गणेश राऊत आणि सचिन तांबे या तिघांनी अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या सुपिया गुरव, राधा दाते, सखी थरवळ यांना सध्या झी मराठी वाहिन्यांवरील सिरीयलविषयी काय वाटते असे पश्न केले. या तिन्ही स्पर्धकांनी अतिशय माफक शब्दांमध्ये चातुर्याने उत्तरे दिली. यानंतर या तिघींमध्ये सरस असणाऱया फर्स्ट रनरअप, सेंकंड रनरअप आणि क्विन ची निवड करण्यात आली.
राधा दाते यांनी या स्पर्धेवर आपली मोहोर उमटवत झी मराठी क्विन होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण शिवानी बावकर, चेतन वडनेरे, तरूण भारत रत्नागिरी आवृत्तीप्रमुख राजाराम खानोलकर, परिक्षक मीरा पोतदार, गणेश राऊत, सचिन तांबे,प्रणिती रिसबूड, तरूण भारत चिपळूण तालुका प्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी विजेत्यांना स्वामिनीकडून पैठणी देवून सन्मानित करण्यात आली.