राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासन अधिकारी तहसीलदार मीना निंबाळकर यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांच्या या निवडीने राधानगरी पंचायत समितीच्या त्या चाळिसाव्या सर्वसाधारण तर सतराव्या महिला सभापती ठरल्या.
राधानगरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच, राष्ट्रीय काँग्रेसच्या चार तर शिवसेना एक असे बलाबल आहे. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार मावळत्या सभापती वंदना हळदे यांनी राजीनामा दिला होता. निवडसभेसाठी दिलीप कांबळे, रविष पाटील, मोहन पाटील, उत्तम पाटील, दीपाली पाटील, कविता मोरे, वनिता पाटील, सुशिला भावके आदी सदस्य उपस्थित होते. सोनाली पाटील यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्या सोळांकुर गावाला बत्तीस वर्षानंतर सभापती पदाची संधी मिळाली आहे. आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, शिवसेनेचे भिकाजी हळदकर, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, सविता चौगले, आर के मोरे, आर आर पाटील, फिरोजखान पाटील, युवराज वारके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.