मागविण्यात आलेल्या हरकतींनंतर क्षेत्र निर्धारित : सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 15 गावांचा समावेश
चंदशेखर देसाई / कणकवली:
राधानगरी अभयारण्यांतर्गत 10 किमी हवाई अंतर हे अभयारण्यासाठीचे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आले होते. यावर मागविण्यात आलेल्या हरकतीनंतर आता केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू मंत्रालयाने अभयारण्याच्या सीमेच्या 200 मीटर अंतरापासून पुढील 6.01 किमी विस्तारित क्षेत्र हे अभयारण्यासाठीचे वन्यजीव अभयारण्य संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून जाहीर केले आहे.
यात सिंधुदुर्गमधील वैभववाडी, कणकवली व कुडाळ तालुक्यातील मिळून 15 गावांचा समावेश आहे. या क्षेत्रात वृक्षतोडीपासून प्रदूषणकारी उद्योग, उत्खनन, लाकूड गिरणी, वीट भट्टय़ा तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर अशा गोष्टींना बंदी असणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्गमधील यात समावेश असणारे 10,026 हेक्टर क्षेत्र हे वनक्षेत्र असल्याचे या स्पष्ट करण्यात आले आहे.
अभयारण्यात 264 प्रजाती
राधानगरी अभयारण्य हे 1985 मध्ये जाहीर करण्यात आले. यासाठी 351.16 किमी क्षेत्र घोषित करण्यात आले होते. या अभयारण्यात विविध पक्षांच्या 264 प्रजाती आढळून येतात. पशु, पक्षी, उभयचर अशा विविध स्पंदने हे अभयारण्य समृद्ध आहे. यात सस्तन प्राण्यांच्या विविध 47 प्रजाती, सरपटणाऱया प्राण्यांच्या 59 प्रजाती, उभयचरांच्या 20, तर फुलपाखरांच्या 66 प्रजातींचा समावेश आहे. या अभयारण्यात बिबटय़ा, गवा, वन्यकुत्रा, अस्वल आदी प्राण्यांचा समावेश आहे.
‘त्या’ क्षेत्रात निर्बंध
या अभयारण्यापासून 10 किमी हवाई अंतर हे संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या अनुषंगाने हरकती मागविण्यात आल्या होत्या. जुलै 2019 मध्ये यावर हरकती मागविण्यात आल्यानंतर अनेक राजकीय पक्ष, संघटना, ग्रामस्थांकडून हे अंतर कमी करण्याच्या अनुषंगाने मागणी होत होती. यापूर्वीच्या हरकती मागविलेल्या क्षेत्र निश्चितीनुसार कणकवली, वैभववाडी व कुडाळ या तालुक्यातील समावेश होणाऱया गावांची संख्या जास्त होती. मात्र, आता हे अंतर 6.01 किमी केल्याने जिल्हय़ातील गावांची संख्या कमी झाली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार आता या क्षेत्रामध्ये वाणिज्यिक उत्खनन, प्रदूषणकारी प्रकल्प, जलविद्युत योजना, घातक पदार्थ वापर किंवा उत्पादन, आरा गिरणी, प्लास्टिक अशा वापरावर, वृक्षतोडीवर तसेच वन्यजीवांना बाधा होईल, अशा गोष्टींना बंदी असणार आहे.
सिंधुदुर्गातील 15 गावे
नव्याने जाहीर केलेल्या 6.01 किमी क्षेत्रात जिल्हय़ातील 15 महसुली गावांचा समावेश आहे. यात कुडाळ तालुक्यातील दुर्गानगर, येवतेश्वर व जांभळगाव, कणकवली तालुक्यातील नरडवे, रांजनगाव, नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, रामेश्वरनगर, गांधीनगर, हरकुळ खुर्द, फोंडा, घोणसरी, तर वैभववाडी तालुक्यातील कुर्ली व शिराळे या गावांचा समावेश आहे. तर यात कोल्हापूर जिल्हय़ातील 26 गावांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील वनक्षेत्र 8861.73 हेक्टर, तर गैरवनक्षेत्र 6177.94 हेक्टर आहे. सिंधदुर्गमधील 15 गावांमधील ज्या क्षेत्रांचा यात समावेश केला आहे, ते 10,026.21 हेक्टर हे वनक्षेत्र असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. याबाबतचे केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे राजपत्र 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हरकतींनंतर अंतर कमी : आमदार नाईक
याबाबत आमदार वैभव नाईक म्हणाले, यापूर्वी हे क्षेत्र 10 किमी हवाई अंतर ठेवून निश्चित करण्यात येत होते. त्याबाबत नोंदविण्यात आलेल्या हरकतींच्या माध्यमातून आता ते कमी करण्यात आले आहे. तरीही या गावांमधील सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.









