पंचगंगाची पाणीपातळी १७ फुटांवर
राजाराम, शिंगणापूर, रुई बंधारे पाण्याखाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सकाळपासून धुंव्वाधार सुरु असून धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरु झाल्याने राधानगरीसह वारणा, कुंभी, कडवी धरणातून सरासरी १२०० क्युसेक विसर्ग सुरु केला आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणीपातळी झपाटय़ाने वाढ होत आहे. सायंकाळी पाच वाजता पाणी पातळी १७ फुटांवर होती. राजाराम, रुई, शिंगणापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. हवेत गारवाही ही होता. दुपारी १२ वाजेणेच्या सुमारास पावसाने जोरदार सुरवात केली. मान्सूनला सुरवात झाल्यापासून सर्वाधिक पावसाची नोंद आजच्या दिवशी झाली. दुपारी दोन नंतर आणखी जोर वाढला. धरणक्षेत्रातीही सकाळपासून दमदार पाऊस झाल्याने राधानगरीतून ५०० क्युसेक, वारणा २५०, कुंभी ३००, कडवी धरणातून १८० क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला. धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळी तीन फुटांनी वाढली आहे सकाळी ११ वाजता १४ फुटांवर होती दुपारी चार नंतर १७ फुटांवर पोहचली. धरणातील विसर्ग, आणि पाऊस असाच सुरु राहिला तर रात्रीतून जिल्हय़ातील, सर्वच बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.