काँग्रेसतर्फे पर्येतून पुन्हा उभा रहाणार : प्रतापसिंह राणे, वडिलांनी राजकारणातून स्वेच्छा निवृत्ती घ्यावी : विश्वजित राणे

प्रतिनिधी /पणजी
एका महत्त्वपूर्ण घडामोडीत पर्ये मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गोवा विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य, पर्येचे आमदार व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आगामी निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षातर्फे पर्येमधून पुन्हा उभा रहाणार असल्याची घोषणा केली. त्यांची घोषणा जाहीर होताच राणे यांचे पुत्र तथा वाळपईचे आमदार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोणत्याही परिस्थिती आपण पर्येतून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार असून 83 वर्षांचे आपले वडील प्रतापसिंह राणे यांनी राजकारणातून स्वेच्छा निवृत्ती घेऊन मोकळे व्हावे, असा सल्ला देऊन जोरदार टीका केल्याने पिता-पुत्र यांच्यातील संघर्ष हा उफाळून आला आहे.
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे आगामी निवडणूक लढविणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पर्ये गट काँग्रेस समितीने प्रतापसिंह राणे यांचेच नाव काँग्रेसच्या निवडणूक समितीकडे पाठविले आहे. राणे यांनी मात्र याबाबत नेहमीच मोघम उत्तर दिले. निवडणूक लढविणार की नाही? असे विचारता राणे यांनी आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सांगितले. तथापि प्रदेश काँग्रेस समिती व काँग्रेस निवडणूक समितीला 1 महिन्यापूर्वीच राणे यांनी आपण निवडणूक लढविणार असे सांगितले होते. भाजपच्या काही नेत्यांना देखील राणे यांनी निवडणूक लढविलेली हवी होती आणि काँग्रेसच्या नेत्यांना देखील राणे यांनी निवडणूक लढविलेली हवी होतीच.
प्रतापसिंह राणेंना कार्यकर्त्यांचा आग्रह
प्रतापसिंह राणे यांना भेटण्यासाठी पर्येतील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते कुळण सांखळी येथील त्यांच्या निवासस्थानी जमले. कार्यकर्ते सुमारे 3 ते साडेतीन तास तिथे होते व त्यांनी राणे यांना कोणत्याही परिस्थितीत निवृत्ती स्वीकारू नये, असे सांगून नव्याने निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहाखातर प्रतापसिंह राणे यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे दुपारी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी राणे यांच्या निवेदनाचे जोरदार टाळय़ा वाजवून स्वागत केले.
प्रतापसिंहांच्या निर्णयावर विश्?वजित संतप्त
प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक लढविणार असे जाहीर करताच त्यांचे पुत्र आणि वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे बरेच संतप्त झाले. गेले सहा महिने विश्वजित राणे यांनी आपल्या पत्नीसाठी वाळपईत आणि स्वतःसाठी पर्ये मतदारसंघातून आपला जनसंपर्क वाढविला आहे. वडील निवृत्त होतील व त्या जागी भाजपतर्फे आपण निवडणूक लढविणार असे त्यांनी या अगोदर भाजप नेत्यांना कळविले होते. वडिलांना त्यांनी निवृत्तीचा सल्ला दिला होता.
क्षमता नसलेले कार्यकर्ते प्रतापसिंहाना देतात चुकीचे सल्ले
प्रतापसिंह राणे यांचा नवयुवकांशी आता संपर्क तुटलेला आहे. गेली 50 वर्षे ते सातत्याने विजयी झाले होते, आता या क्षणी त्यांनी पराभव स्वीकारू नये, त्यापेक्षा स्वेच्छा निवृत्ती घेऊन मोकळे व्हावे. ज्यांना एक प्रभागातून देखील विजयी होण्याची क्षमता नाही, अशा व्यक्ती राणे यांना निवडणूक लढविण्याचा सल्ला देतात व आपले वडील दुर्देवाने त्यांचा सल्ला स्वीकारतात हे त्यांनी टाळावे, असे विश्वजित राणे म्हणाले.
वीस वर्षे आपण वडिलांना करतोय मदत
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे म्हणणे आहे की गेली 20 वर्षे ते पर्येमध्ये जाऊन वडिलांसाठी प्रचार करीत आहे. आपल्या मतदारसंघाचे काम सोडून आपण पर्येमध्ये वडिलांना निवडून आणण्यासाठी मदत करीत होतो म्हणूनच ते मोठय़ा मतांधिक्क्याने विजयी होत होते.
राणे पिता-पुत्र यांच्या दरम्यान गेले काही महिने चालू असलेला संघर्ष राजकारणानेच काल मंगळवारी उघड झाला आणि त्याला नाटय़पूर्ण वळण मिळू लागले. विश्वजित यांनी आपल्याच वडिलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याने एकच खळबळ माजली.
विश्वजितने पर्येतून लढण्याबाबत कधी सांगितले नाही : प्रतापसिंह
प्रतापसिंह राणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आपण कधीही वाळपई मतदारसंघात जाऊन ढवळाढवळ केली नाही. विश्वजितने आपल्याला कधीही आपण पर्येतून निवडणूक लढविणार असे सांगितलेही नाही. कार्यकर्त्यांनी आपल्याला आग्रह केलेला आहे. कार्यकर्त्यांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आपण निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला. जर विश्वजित निवडणूक लढविणार असतील तर त्यांनी मला अवश्य सांगितले पाहिजे होते, त्यांनी कधीही सांगितलेले नाही.
वय झालेय, स्वेच्छा निवृत्ती घेऊन मोकळे व्हा : विश्वजित
प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक लढविणार असे जाहीर करताच आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, आपण वडिलांना मान सन्मान देतो, परंतु ते आता 83 वर्षाचे झालेत. त्यांनी स्वेच्छा निवृत्त होऊन मोकळे व्हावे. क्षमता नसलेले कार्यकर्ते त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत. आपण पर्येमधून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय या अगोदरच घेतलेला आहे. आता वडील देखील उभे राहिले तरी आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढविन, आणि आपण 10 हजार मतांच्या फरकाने विजयी होणार आहे, असे ते म्हणाले.









