आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची घोषणा : रविवारी घेतले श्री देव बोडगेश्वराचे दर्शन
प्रतिनिधी /पणजी
रविवारी श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला होता. हजारोंच्या संख्येने भक्तगणांनी श्रींचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे अलोट गर्दीमुळे वाहने गिरी, म्हापसा पालिका, पर्रापर्यंत पार्किंगच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेतले. यंदा दि. 28 जानेवारी रोजी आरोग्यमंत्र्यांचे वडील प्रतापसिंग राणे यांचा वाढदिवस असून त्यादिवशी आपले वडील श्री देव बोडगेश्वरचरणी सोन्याची मशाल अर्पण करणार असल्याची घोषणा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केली.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर, माजी नगरसेवक आशिष शिरोडकर, उपाध्यक्ष देवेश शिंदे, सचिव ऍड. वामन पंडित, पांडुरंग वराडकर, सुशांत गावकर, श्यामसुंदर पेडणेकर आदी उपस्थित होते.
कार्यालयात पत्रकारांशी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी यास पुष्टी दिली. यावेळी माजी आमदार किरण कांदोळकर, दयानंद सोपटे, दिलीप परूळेकर यांनीही श्रींचे दर्शन घेतले. सर्व म्हापसावासीय व भक्तगणांतर्फे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आरोग्यमंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत केले व त्यांचे आभार मानले. शिवाय देवस्थान कमिटी उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल यांचे अभिनंदन केले. यावेळी दिलीप परूळेकर, दयानंद सोपटे यांनीही देवस्थान कमिटीचे अभिनंदन केले.









