जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची उपरोधीक टीका : सरकारवर टीका होण्यासाठी राणेंचे प्रयत्न!
वार्ताहर / कणकवली:
जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक कोरोना साथीच्या काळात काम करताना केवळ उणिवा शोधत व चुका काढत, अपमानीत करण्याचे काम आमदार नीतेश राणे यांच्याकडून केले जात आहे. मतदारसंघातील जनतेची एवढीच काळजी असती, तर राणे हे मुंबईत जाऊन थांबले नसते. मुंबईतून ट्विट करत केरळहून रॅपीड टेस्ट किट व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱया गोळ्य़ा देण्याची घोषणा राणे यांनी केली. अशा अनेक घोषणा त्यांनी यापूर्वी केल्या. त्यात औषध आपल्या दारीही योजना होती. त्या योजनेप्रमाणेच राणेंना या नवीन घोषणांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी उपरोधीक टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.
येथील जिल्हा बँकेच्या शहर शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, पालकमंत्री व आमदार नाईक कोरोनाच्या लढय़ात व्हीडिओ कॉन्फरन्सिंग व घरात बसून काम न करता, जनतेपर्यंत पोहोचून जनतेची काळजी घेत आहेत. सर्वपक्षिय बैठक घेत पालकमंत्र्यांनी जनतेच्या आरोग्याला महत्व दिले. मात्र, यातही राणे यांनी ‘इगो’ करत जनतेच्या आरोग्याला दुय्यम स्थान दिले. टीका करणे हा राणे यांचा स्थायीभाव आहे.
20 मार्च रोजी राणे मुंबईला गेले, ते पुन्हा 22 एप्रिल रोजी आले. मुंबईतून आल्यावर काही बैठकांमध्ये प्रशासनाचे कौतूक व काही बैठकांमध्ये टीका करत रस्त्याने फिरत अनाऊंन्सिंगही केले. मात्र, सोनवडय़ात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा मुंबईला गेले. राणे जिल्हय़ात नसले, तरी पालकमंत्री व प्रशासन जनतेची काळजी घेत आहेत. आम्ही जिल्हय़ात आलो नाही, तर काहीच होणार नाही, या भ्रमात राणे यांनी राहू नये. ज्या व्हीडिओ कॉन्फरन्सवर राणे यांनी टीका केली, त्याच माध्यमांचा वापर करत राणेंनी सरपंच व पं. स. सदस्यांसोबत संवाद साधला. मतदारसंघातील काही ग्रा.पं.मध्ये क्वारंटाईन व्यवस्थेवरून सरकारवर टीका कशी होईल, याचे प्रयत्न राणे यांनी सुरू केल्याचा आरोप सावंत यांनी केला.
मुंबईहून आलेल्या राणेंनी आढावा बैठकीत चाकरमानी गावी येता नयेत, अशी तर, दुसऱया बैठकीत चाकरमानी आले पाहिजेत, अशी दुटप्पी भूमिका घेतली. आम्ही आमचे जीव धोक्यात घालून नियम पाळत कोरोना निर्मूलनासाठी जिल्हय़ात काम करत असताना ते केवळ राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राजन तेली यांनी स्वॅब तपासणी मशीन जिल्हा रुग्णालयात धूळ खात पडून असल्याच्या केलेल्या वक्तव्याबाबत सावंत यांना विचारले असता, याबाबत तेली यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. सर्वपक्षिय बैठकीत तेली व काळसेकर यांनी मांडलेल्या चांगल्या सूचनांचे पालनच केले, असे सावंत म्हणाले.
मुंबईत बसून गावातील समस्या समजत नाहीत!
मुंबईत राहून सल्ले देणे सोपे आहे. मात्र, सरपंच व स्थानिक पातळीवर प्रशासनाला येणाऱया समस्यांना तोंड देणे हे येथे आल्याशिवाय समजणार नाही. राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझीही बदनामी केली. पण त्याचे उत्तर वेळ आल्यावर देऊ. पक्षीय पातळीवर गावात येणाऱया चाकरमान्यांबाबत राणे राजकारण करत असून गावातील वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न करण्यामागे त्यांचा हेतू काय, असा सवाल सावंत यांनी केला.









