ऑनलाइन टीम / मुंबई :
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत परवा कोणतीही बैठक झाली नाही. तसेच त्यांची भेटही झाली नाही, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ते म्हणाले, आमच्या भेटीगाठी होत असतात. पण, परवा मात्र राज ठाकरेंसोबत माझी भेट झाली नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मनसे आणि आमची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे तूर्तास तरी आमची युती होण्याची कोणती शक्मयता नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, भविष्यात त्यांची भूमिका बदलली तर विचार करता येईल, असे संकेतही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भेटल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. त्यामुळे सगळय़ाचे लक्ष राजकारणातील नव्या समिकरणाकडे लागले होते. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.









