मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली नाही. चंद्रकांत पाटील राज ठाकरेंना भेटल्यानं पक्षश्रेष्टी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे संघटन प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची त्यांना माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच पक्षश्रेष्ठी नाराज असते, तर नड्डा आणि अन्य नेते भेटले असते का?, असा सवाल देखील त्यांनी केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
दिल्ली दौऱ्यावरून परत आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांना दिल्याचे सांगितले. राज यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे केंद्रीय नेतृत्वाला सांगितले. त्यावर आमच्या नेतृत्वाने ठिक है, एवढीच प्रतिक्रिया दिली. आमचे केंद्रीय नेते फार कमी बोलतात. आपल्या बोलण्यातून सिग्नल देईल एवढं सिंपल आमचं नेतृत्व नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
संघटनेचे प्रमुख नड्डा, संघटन चालवणारे संतोष आहेत. त्यांची भेट झाली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मनसे भेटीमुळे रेड अॅलर्ट द्यायचा असता किंवा या भेटीमुळे ते माझ्यावर नाराज असते तर हे नेतेही मला भेटले नसते. नाराजी असती तर नितीन गडकरी, नड्डा आणि संतोषजींनी भेट नाकारली असती. गडकरी म्हणजे महाराष्ट्र आहे. गडकरींनी आम्हाला साग्रसंगीत जेवणही दिलं, असंही त्यांनी सांगितलं.








