ऑनलाईन टीम / मुंबई :
अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात जवळपास तीन आठवड्यांपासून अटकेत असलेला व्यावसायिक तथा अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा व त्याच्या कंपनीतील आयटी प्रमुख रायन थॉर्प यांना मुंबई हायकोर्टाने जामीन नाकारला असल्याने दिलासा मिळू शकला नाही. न्या. अजय गडकरी यांनी त्यांच्या याचिकांवरील सुनावणीअंती 2 ऑगस्ट रोजी राखून ठेवलेला निर्णय शनिवारी जाहीर करताना याचिका फेटाळत असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोघांना 19 जुलै रोजी अटक केली आणि न्यायदंडाधिकारी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते सध्या 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी केलेली अटक कारवाई आणि न्यायदंडाधिकारी कोर्टाने दिलेला कोठडीचा आदेश याच्या वैधतेला दोघांनी याचिकांद्वारे आव्हान दिले होते. पोलिसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 41 – अ अन्वये नोटीस न देताच थेट अटक कारवाई केल्याने ती बेकायदा असल्याचा दावा कुंद्राने केला होता; तर पोलिसांनी दिलेली नोटीस मी स्वीकारली, पण मला त्याविषयी प्रतिसाद द्यायला संधीच देण्यात आली नाही, असा दावा थॉर्पने केला होता. तर कुंद्राने नोटीस स्वीकारली नाही आणि या दोघांनी व्हॉट्स ॲपवरील संभाषणे व व्हॉट्सॲप ग्रुप डिलीट करून पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केल्यानेच त्यांना अटक करावी लागली, असा युक्तिवाद पोलिसांनी मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांच्यामार्फत केला होता.
‘पोलिसांची अटक कारवाई आणि त्यानंतर न्यायदंडाधिकारी कोर्टाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्याचा दिलेला पहिला आदेश हे कायदेशीरदृष्ट्या वैध आहे, असे निरीक्षण नोंदवत न्या. गडकरी यांनी दोघांच्याही याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयाविरोधात कुंद्रा व थॉर्प यांच्याकडून सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबई सेशन्स कोर्टातही जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. सेशन्स कोर्टाने त्याविषयी पोलिसांचे उत्तर प्रतिज्ञापत्रावर मागून पुढील सुनावणी 10 ऑगस्टला ठेवली आहे.









