गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंटचा आरोप : म्हादई, मोले अभयारण्य या विषयावर पूर्णपणे दुर्लक्ष
प्रतिनिधी / पणजी
कोविड महामारीच्या नावाखाली सध्या गोवा सरकार अनेक गोव्याच्या हिताच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊन, कोविड महामारीच्या निमित्ताने म्हादई, मोले अभयारण्य यासारख्या विषय दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या राज्य सरकार कोरोनाच्या धंध्यात व्यस्त असून, त्यांना गोव्याच्या अस्तित्वाचे व लोकांचे काहीच पडलेले नाही. असा आरोप गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंटचे ऍड. ह्दयनाथ शिरोडकर यांनी केला.
पणजीत सोमवारी आयोजित पत्रकार परीषदेत ऍड. ह्दयनाथ शिरोडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत महेश म्हांबरे, हमीद शेख, व रितेश शणैयी उपस्थित होते.
कोविड महामारी गोव्यात येण्या अगोदर गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंटतर्फे ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ हे आंदोलन सुरु केले होते. कोविडमुळे हा विषय पुढे नेणे शक्य झालं नाही, हा विषय सरकारने घ्यावा यासाठी देखील अनेक खटाटोप केले तरी डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार या विषयावर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परंतु या काळात कर्नांटक सरकारने डीपीआर सादर केले. दरम्यान आम्ही पत्रकार परीषदाद्वारे मागणी केली की राज्य सरकारने यावर भाष्य करावे परंतु सरकारने यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य केले नाही, त्यामुळे सरकारने आता स्पष्ट करणे आवश्यक आहे की सदर डिपीआर कर्नाटकने गोवा सरकारला विश्वासात घेऊन केले आहे की नाही. असे ऍड. शिरोडकर यांनी पुढे सांगितले.
गोवा सरकारने म्हादई वाचविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे हालचाली केल्या नाहीत, केंद्र सरकारपर्यंत कुठलाच विषय पोहचलेला नाही. आता म्हादई सारखे मोले अभयारण्य देखील गोव्याच्या हाताबाहेर जात आहे. केंद्र सरकार सध्या मोले येथे आघात करत आहे. मोले येथे 3 मोठे प्रकल्प येत आहे. त्यामुळे आता मोले अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात आहे. दुधसागर धबधबा नष्ट होऊ शकतो. याअनुषंगाने आम्ही दि. 5 जून रोजी प्रधानमंत्री, गोवा गर्वनर, केंद्रीय पर्यावरण मंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री, व गोव्याचे पर्यावरणमंत्री यांना पत्र केले होते परंतु फक्त प्रधानमंत्रीकडून पत्र पोहचले म्हणून उत्तर आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चासाठी वेळ मागीतल्यास त्यांच्याकडे वेळ नाही आहे. असे महेश म्हांबरे यांनी सांगितले.
मोले येथे नविन 3 प्रकल्प येत असले तरी या भागातील लोकांना विश्वासात घेतलेले नाही. सरकार पूर्णपणे मनमानी करत आहे. अशा प्रकारे गोव्याचे असित्व संपले तर येणाऱया पुढच्या पिढीला काय सांगणार, त्यामुळे लोकांनी आता जागृत होऊन एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठविले पाहीजे. असे आवाहन महेश म्हांबरे यांनी यावेळी केले.









