ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचे कारण देत अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे. तेही 5 दिवसांचेच. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची आमची मागणी मान्य केली जात नाही. त्यामुळे राज्य सरकारची भूमिका अधिवेशन टाळण्याची दिसत असून, ते अधिवेशनापासून दूर पळत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यापूर्वीच लांबणीवर पडलं आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते नागपूर ऐवजी मुंबईत 20 ते 25 डिसेंबर दरम्यान होणार आहे. केवळ 5 दिवसांचे अधिवेश आहे. पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो, त्यामुळे यंदाचं अधिवेशनही केवळ 4 दिवसांचं असणार आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची आमची मागणी होती. मात्र, ती मान्य झाली नाही.
तारांकीत प्रश्नांवर गेल्या 2 वर्षात एकदाही उत्तर देण्यात आलं नाही, लक्षवेधीलाही उत्तर मिळत नाहीत. त्यामुळे सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहे. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरी देण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी नाही. गेल्या दोन वर्षात विदर्भात एकही अधिवेशन झाले नसल्याने तेथील लोकांचीही नाराजी आहे. त्यामुळे मार्चमधील अधिवेशन नागपूरात घेण्याची मागणी आम्ही केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.








