मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून अखेर आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील.
नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
राज्य सरकारचे नवे निर्बंध
1. सर्व किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकरची अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मच्छी-मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, ताडपत्री इ.) विकणारी दुकाने यांना सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे.
2. वरील सर्व दुकानांमधून होम डिलीव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
3. स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापनाला कोणत्याही सेवेचा किंवा सुविधेचा समावेश अत्यावश्यक सेवा किंवा सुविधेमध्ये करायचा असल्यास त्यासाठी राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापनाची परवानगी घेणं बंधनकारक असेल.
4. वर उल्लेख केलेल्या नव्या बदलांशिवाय इतर सर्व निर्बंध हे 13 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांनुसारच असतील.








