तटपुंजे अनुदान देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार : सदर निधीअंतर्गत कोणती विकासकामे राबवायची? : बैठकीत विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. बिलाची रक्कम भरली नसल्याने पथदिपांचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला होता. निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर केवळ 16 लाख 50 हजारांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. सदर निधीअंतर्गत कोणती विकासकामे राबवायची? असा मुद्दा उपस्थित झाल्याने याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने कॅन्टोन्मेंटच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली. निधी उपलब्ध नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. पाणीपट्टी आणि विद्युतबिलाची 5 कोटीची रक्कम थकबाकी आहे. ही रक्कम भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. राज्य शासनाने एसएफसी अनुदानांतर्गत केवळ 16 लाख 50 हजारांचा निधी मंजूर केला आहे. कोटय़वधीची देणी असताना केवळ लाखात अनुदान मंजूर केले असून ही रक्कम विकासकामे राबविण्याकरिता वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे 16 लाखात कोणती कामे करायची, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
निधीअभावी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांचे वेतन देण्यात आले नाही. तसेच दिवाळी सणाचा बोनसही देणे आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्याचे निम्मे वेतन देण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱयांचे वेतन कसे करायचे? ही समस्यादेखील निर्माण झाली आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. निधी उपलब्ध नसल्याने निम्मे वेतन देण्यात यावे. तसेच सप्टेंबर महिन्याचे निम्मे वेतन देण्याची सूचना अध्यक्षांनी केली. बोनस नंतरच्या टप्प्यात देण्याची सूचना अध्यक्ष रोहित चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना केली.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने पार्किंग शुल्क आकारण्यात येते. सदर शुल्क वसुलीसाठी निविदा काढण्यात येते. सदर निविदेबाबत चर्चा करून कंत्राटदार निश्चित करण्यात आला. तसेच विविध विकासकामे आणि कॅन्टोन्मेंटच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद, कार्यालय अधीक्षक एम. वाय. ताळूकर, कार्यकारी अभियंते सतीश मन्नुरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.









