खोची/प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी खोची ता. हातकणंगले येथील अत्याचार होऊन खून झालेल्या सहा वर्षीय बालिकेच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी बोलताना त्यांनी सदर घटना अत्यंत दुर्दैवी व समाजाला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा मी निषेध करते. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असून मी या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत यांच्या संपर्कात असून तपास योग्य पद्धतीने चालू असून आरोपीला फाशीची शिक्षा निश्चित होईल, असे सांगून सरकारच्यावतीने सदर कुटुंबाला आर्थिक सहाय्यही मिळवून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राज्य उपाध्यक्षा प्रविता सालपे, हातकणंगले तालुका महिला अध्यक्षा सुनिता पोळ, प्रदेश प्रतिनिधी प्रा. बी. के. चव्हाण, सरपंच जगदीश पाटील, वडगाव बाजार समितीचे संचालक एम. के. चव्हाण, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी रूपालीताई चाकणकर यांनी घटना घडलेल्या घटनास्थळाची व परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून तपास अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. मयत मुलीच्या कुटुंबीयांनी व उपस्थित नागरिकांनी सदर प्रकरणाचे आरोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशी झाली पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न करा,अशी मागणी केली.यावेळी त्यांनी सदर प्रकरणी एक महिन्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी माहिती दिल्याचे सांगितले. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी व प्रसिद्ध वकील देण्यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.