बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात भाजप नेतृत्व बदलाविषयी वारंवार चर्चा सुरु आहेत.भाजपच्या अनेक नेत्यांनीही राज्यात नेतृत्व बदल होणार नसल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी सांगितले की, नेतृत्त्वाच्या मुद्यावर राज्य भाजपमध्ये कोणताही गोंधळ नाही आणि पक्ष एक आहे.
ते म्हणाले की एक-दोन आमदार किंवा नेते नाराज असतील त्यांच्याशी पक्ष त्यांच्याशी चर्चा करेल. कर्नाटकचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या तीन दिवसांच्या राज्य दौर्याच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी याविषयी विधान केले होते.
“अरुण सिंग कर्नाटकचे प्रभारी आहेत, ते राज्यात येत आहेत, ते सर्व आमदार आणि संसद सदस्यांशी चर्चा करतील, राज्यात कोणताही गोंधळ नाही. त्यांना कुणीही भेटू शकेल. ते सविस्तर माहिती घेतील. “अरुण सिंग काही दिवस कर्नाटकात असतील. मुख्यमंत्री म्हणून मीही त्यांच्याबरोबर आहे आणि आवश्यक सहकार्य करीन,” असे मुख्यमंत्री येडीयुरप्पा म्हणाले.
दरम्यान, कर्नाटक भाजपचे प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दात सांगितले होते की बी.एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री आहेत आणि राहतील. ते चांगले काम करत आहेत. राज्याच्या नेतृत्वावर केंद्राचा पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले होते.









