14 जूननंतर कोअर कमिटीची होणार बैठक : भाजप राज्य प्रभारी अरुणसिंग येणार बेंगळुरात
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य भाजपमधील अंतर्गत गोंधळ आणि नेतृत्व बदलाविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी भाजपश्रेष्ठी सरसावले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य भाजप कार्यकारिणी आणि पक्षाच्या समन्वय समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याने याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.
भाजप हायकमांडने दिलेल्या सूचनेवरून कर्नाटक भाजप राज्य प्रभारी अरुणसिंग यांनी कोअर कमिटीची आणि समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. 14 जूननंतर या बैठका होणार आहेत. त्यासाठी अरुणसिंग राज्य दौऱयावर येणार आहेत. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव भूपेंद्र यादव हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
पक्षातील आमदारांची मते जाणून घेण्यासाठी अरुणसिंग हे पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांचीही बैठक घेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच राज्य भाजपमधील गोंधळावर पडदा पडण्याची शक्यता आहे. नेतृत्व बदलाविषयी भाजप हायकमांड कोणता निर्णय घेते, याविषयी कुतूहल कायम आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी काही दिवसांपूर्वीच हायकमांडने सूचना केल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे राज्य भाजपमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. नेतृत्व बदलाची मागणी आणि त्याविरोधात वक्तव्ये, मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ सहय़ा जमा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असून त्याचा भडका उडण्याआधीच हायकमांडने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य भाजपमधील गोंधळ चव्हाटय़ावर येण्याआधीच प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी राज्यातील नेत्यांना नेतृत्वबदल आणि एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप न करण्याची सूचना केली आहे. तसेच राज्यात नेतृत्वबदल नाहीच असे स्पष्टीकरणही केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी आणि नलीनकुमार कटील यांनी दिले होते. तरी सुद्धा राज्य भाजपचे मुख्य प्रतोद सुनीलकुमार यांनी आमदारांची मते जाणून घेण्यासाठी स्वतंत्रपणे बैठका घेण्याची मागणी ट्विटरवर केली होती.
या पार्श्वभूमीवर पक्षातील गोंधळावर पडदा टाकण्यासाठी कोअर कमिटी आणि समन्वय समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतला आहे. या बैठकीत नेतृत्व बदलाबाबत कोणता निर्णय होईल, हे नंतरच स्पष्ट होणार आहे.









