वेतनास विलंब, मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी / बेंगळूर
केएसआरटीसी आणि बीएमटीसीच्या कर्मचाऱयांना वेतन देण्यास विलंब आणि यापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्याने पुन्हा बस बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. डिसेंबर महिन्यात चार दिवस संप पुकारल्याने राज्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी सरकारने 10 पैकी 9 मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वास्तविक ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. शिवाय डिसेंबर महिन्यापासून अर्धे वेतन देऊन सरकारने दिशाभूल केली आहे, असा आरोप परिवहन कर्मचारी संघटनेने केला आहे.
परिवहन कर्मचाऱयांना अनेक महिन्यांचा भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही. संप पुकारलेल्या संघटनेतील पदाधिकाऱयांना लक्ष्य बनवून त्यांच्याविरोधात दाखल केलेले खटले राज्य सरकारने मागे घेतलेले नाहीत. डिसेंबरपासून निम्मे वेतन दिले जात आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच दखल न घेतल्याने पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशा इशारा राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे मानद अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिला आहे.









