प्रतिनिधी / गारगोटी
आमदार प्रकाश आबिटकर यांची राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यातील कृषी महाविद्यालयांचे या परिषदेकडून नियंत्रण केले जाते.
आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेकडून निवडून जिल्ह्यातील आलेले एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश होईल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना मंत्रीपदाची हुलकावणी मिळाली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कृषी मंत्री दादा भुसे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी सुचविले आहे.
उपसचिव सु.सं. धपाटे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र आज दिले आहे. आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेकडून दुसऱ्यांदा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांच्या निवडीने कार्यकर्त्याच्यात उत्साहाचे वातावरण आहे.