चाचण्याची क्षमता वाढणार : 2000 आरएनए एक्स्रेक्शन कीट, 1 लाख लिटर सॅनिटायझस प्राप्त : 500 थर्मल गन्सची शिफारस
प्रतिनिधी / पणजी
पणजी येथील वन भवन येथे काल झालेल्या राज्य कार्यकारी समितीच्या (एसईसी) बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षांनी लागू केलेल्या आणि एमएचएने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. चर्चा केल्यानंतर, एसईसीने सूचनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी काही निर्णय घेण्यात आले.
मुख्य सचिव परीमल राय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी एसईसीचे सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रधान सचिव आयएएस पुनित गोयल, वाहतूक सचिव आयएएस एस.के. भंडारी, महसूल सचिव, एसईसी आणि एसडीएमएचे सदस्य आयएएस संजय कुमार उपस्थित होते. आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी 3 एप्रिल नंतर कोविड-19 चा एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती दिली.
भविष्यात चाचण्या करण्याची क्षमता प्रति दिन 80 पर्यंत वाढविणार
आजपर्यंत, कोविड-19 चे गोव्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, ज्यातले पाच रुग्णांचे आरोग्य सुधारले आहे आणि त्यांना कोविड-19 हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या क्वॉरंटाईन सुविधेमध्ये हलविण्यात आले आहे. आज आयएलआय लक्षणे असलेल्या रुग्णांचे नमुने घेऊन 30 जलद चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती श्रीमती मोहनन यांनी दिली. सर्व चाचण्या नॅगेटिव्ह आल्या आहेत. भविष्यात चाचण्या करण्याची क्षमता 30 प्रति दिन ते 80 प्रति दिन अशी वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यात अद्याप कोणत्याही समुदायाचा प्रसार झालेला नाही याची दक्षता एसईसीने नोंदविली आहे.
शुक्रवारपर्यंत सर्व आरएमडी, उपकेंदे उघडणार
विभागाला 2000 आरएनए एक्स्रेक्शन कीट दिल्लीहून प्राप्त झाली आहेत आणि हा साठा राज्याच्या आतापर्यंतच्या आवश्यतेनुसार पर्याप्त आहे. विभागाला थर्मल गन्सची कमतरता होऊ नये आणि भेट देणाऱयांचे तापमान तपासण्यात येण्याच्या दृष्टीने एसईसीने 500 गन्स विकत घेण्याची शिफारस केली आहे. श्रीमती मोहनन यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात आपत्कालिन ओपीडी सुरु होत्या. याव्यतिरिक्त, आरोग्य विभागाने जन्मपूर्व उपक्रम आणि मुलांसाठी लसीकरण वेळापत्रक पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले केले आहेत. आज राज्याच्या दुर्गम भागातून सहा आरएमडी सुरू केल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. दररोज सहा आरएमडी उघडल्या जातील, जेणेकरून शुक्रवारपर्यंत 30 आरएमडी सुरु करण्यात येतील. त्याच धर्तीवर, दररोज 30-40 उपकेंदे उघडली जातील, जेणेकरून शुक्रवारपर्यंत सर्व उघडली जातील. सविस्तर चर्चेनंतर, काही वेळेत, पीएचसी/सीएसी आणि जिल्हा हॉस्पिटलमध्ये ओपीडी उघडण्यावर निर्णय घेण्यात येईल.
सॅनिटायझर्सचे एकूण उत्पादन 1 लाख लिटरपर्यंत पोहोचल्याचे आहे. त्यापैकी सुमारे 22,000 लीटर राज्य सरकार आणि गोव्यातील संरक्षण अधिकाऱयांना विनाशुल्क दिले जाते, अशी माहिती अबकारी आयुक्त अमित सतीजा यांनी दिली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱया गटांनासुध्दा त्यांच्या वापरासाठी सॅनिटायझर्स दिले आहेत. एसईसीने सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवसाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रात्री 8 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, लाईव्ह फिडच्या आधारे जवळजवळ 2.39 लाख सर्वेक्षण नोंदी करण्यात आल्या आहेत.
खाद्यपदार्थांचा पुरवठा सुरळीत चालल्याची माहिती नागरी पुरवठा सचिव ईशा खोसला यांनी दिली आहे. दुग्धव्यवसायासाठी फलोत्पादन महामंडळाने बागायती उत्पादन थेट शेतकऱयांकडून गोळा करण्यासाठी यंत्रणा बसवावी, असे आदेश एसईसीने यावेळी दिले आहेत.
सद्या कांदोळीत पाच तर ओल्ड गोवा रॅसिडेन्सीत तीघे जण क्वॉरंटाईन
मत्स्यव्यवसाय सचिव तथा क्वॉरंटाईन सुविधेचे नोडल अधिकारी पी.एस. रेड्डी यांनी मडगाव येथे क्वॉरंटाईन ठेवलेल्या सर्व लोकांना सोडले आहे आणि सद्या, कांदोळी येथे फक्त पाच क्वॉरंटाईनमध्ये ठेवले आहेत आणि ओल्ड गोवा रॅसिडेन्सीमध्ये तीन आहेत, अशी माहिती दिली.
श्री. राय यांनी राज्यातील मास्क तयार करण्याची स्थिती स्पष्ट केली आणि गोव्यात उपलब्ध स्थानिक कलागुणांचा वापर करून या मास्कचे उत्पादन आणि विक्री वाढविण्याच्या पद्धती सुचविण्याविषयी सर्वांकडून सूचना मागविल्या. हस्तकला महामंडळ मास्क विक्री व पुरवठय़ात समन्वय साधू शकेल, असे चर्चेनंतर एसईसीने ठरविले. मास्कचे दर अत्यावश्यक वस्तू म्हणून निश्चित करण्यात आले आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याचे वगळता अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत अधिक शुल्क आकारणे हा गुन्हा मानला जाईल, असे नागरी पुरवठा सचिवांनी सांगितले.
पेड क्वॉरंटाईन सुविधेसाठी 20,000 खोल्या
पर्यटन सचिव आयएएस जे. अशोक कुमार यांनी सांगितले की, पर्यटन विभागाने 20,000 खोल्या शॉर्टलिस्ट केल्या आहेत ज्याचा पेड क्वॉरंटाईन सुविधा म्हणून वापर केला जाऊ शकतो. सामाजिक अंतर इत्यादी नियमांचे पालन केले तर अन्न साखळीचा एक भाग असल्याने गिरण्यांचे काम परवानगी दिलेल्या क्षेत्रात येते, असे एसईसीने स्पष्टीकरण दिले.









