आत्मचिंतन करून साजरा करणे गरजेचे : डिजेचा कर्णकर्कश आवाज-हिडीस नृत्यांमुळे नागरिकांतून नाराजी, प्रशासनाचे मौन
प्रतिनिधी /बेळगाव
डी.जे.च्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन, बॅरिकेड्स लावून वाहतुकीत अडथळा, रस्ते बदल करून नागरिकांची गैरसोय, रात्री उशीरापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, इतक्मया सर्व गैरसोयी अथवा समस्या निर्माण करून राज्योत्सवाच्या निमित्ताने प्रशासन काय साधते आहे?, राज्योत्सवाचे स्वरुप उत्सवातून उन्मादाकडे वळत असतानासुद्धा संपूर्ण शहराला वेठीस धरत प्रशासन मौन भूमिका कसे घेऊ शकते? असा प्रश्न शहरवासीय करत आहेत. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला त्याच्या मतस्वातंत्र्याचे, उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य निश्चितच आहे. पण स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी प्रशासन अशाच पद्धतीने झटकत राहिली तर आगामी काळात लोकच विद्रोही भूमिका घेण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
सीमाभागातील मराठी भाषिक हे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून कोणताही उत्सव किंवा समारंभ साजरा करत असतात. कधीच कर्नाटक सरकारच्या निधीवर ते अवलंबून नसतात. शिवजयंती, गणेशोत्सव या मिरवणुका तर संपूर्ण भारतात आदर्शवत आहेत. संस्कृती काय असते? हे या मिरवणुकीतून दाखविले जाते. मात्र या मिरवणुका मोठय़ा उत्साहाने उत्स्फूर्तपणे स्वखर्चातून होतात. पण सरकारच्या पैशातून राज्योत्सव साजरा करण्यासाठी परजिह्यातून कार्यकर्त्यांना आणून धिंगाणा घातला जातो. त्याबद्दल बेळगावच्या सर्वच समाजातील नागरिकांमध्ये नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण शहरातील रस्त्यांवर बॅरिकेड्स घालून पोलिसांनी अडविले. त्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा मोठा त्रास झाला. रुग्णवाहिका देखील जाण्यास जागा नव्हती. यामुळे अक्षरशः या राज्योत्सवाच्या नावाने साऱयांनीच शिमगा केला.
इतिहास दाखवण्याची संधी दवडली
केवळ कर्कश आवाजाची डी. जे. लावणे आणि समोर हिडीस नृत्य करणे या व्यतिरिक्त या मिरवणुकीतून समाज प्रबोधन काहीच झाले नाही. वास्तविक कर्नाटकामध्ये अनेक स्थळे आहेत, राजे होऊन गेले, त्यांचा इतिहास दाखविण्याची संधी होती. मात्र ही संधी आयोजकांनी हुकविली.
लाल-पिवळय़ा रंगाचा अनधिकृत असलेला झेंडा घेऊन धिंगाणा घालणे या व्यतिरिक्त या मिरवणुकीमधून काहीच दिसले नाही. महत्त्वाचे म्हणजे धारवाड, बैलहोंगल, रायबाग, हुबळी या परिसरातून हे कन्नड दुराभिमानी आले होते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते मात्र दूरच होते. त्यामुळे येथील कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱयांचाही भ्रमनिरास झाला होता.
बेंगळूर येथील कन्नड संघटनांना राज्योत्सव साजरा करण्यासाठी निधी दिला आहे. मात्र बेळगावमधील कन्नड संघटनांना राज्योत्सव साजरा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी दिला नाही. त्यामुळे अनेक मंडळांनी नाराजी व्यक्त केली. आता निवडणुका असल्यामुळे काही राजकीय व्यक्तींनी मात्र त्यांची मनधरणी करून त्यांना काही रक्कम दिल्याने त्यांनी राज्योत्सवामध्ये डी. जे. लावून धिंगाणा घातला. एकूणच राज्योत्सव हा सरकारच्या पैशावरच साजरा केला जातो, हेही यावरून दिसून आले.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद
या राज्योत्सव मिरवणुकीमुळे पोलिसांना मात्र दिवसभर उपाशीच सेवा बजावावी लागली. यामुळे काही पोलिसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अतिउत्साही कार्यकर्ते पोलिसांबरोबर वाद घालत होते. त्यामुळे पोलीसही अक्षरशः कंटाळले होते. महत्त्वाचे म्हणजे राज्योत्सव कर्नाटकाचा आणि मराठी गाण्यांवरच अधिकतर डी.जे. सुरू होते. त्यावरच कन्नड कार्यकर्ते ठेका धरत होते, याबद्दलही जोरदार चर्चा सुरू होती.
राज्योत्सवाला सुटी असल्यामुळे एक दिवस विरंगुळा म्हणून आपणही मिरवणुकीत भाग घेऊ, या उद्देशाने बरेचजण बेळगावात दाखल झाले. शासकीय कार्यालयातील अधिकाऱयांना आणि शिक्षकांना आणि शाळेतील कर्मचाऱयांना राज्योत्सव मिरवणुकीत भाग घेण्याची सक्तीच करण्यात आली होती.
मिरवणुकीत शिस्तीचा हिरमोड
राज्योत्सव साजरा करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी अधिकाऱयांच्या बैठकांवर बैठका घेतल्या होत्या. याचबरोबर कन्नड संघटनांनाही बोलावून घेऊन या मिरवणुकीत अधिक संख्येने भाग घेण्यासाठी विनंती केली होती. तरीदेखील बेळगावातील स्थानिक कन्नड लोकांनी या मिरवणुकीकडे पाठच फिरवली होती. बेळगावात दाखल झालेले इतर जिह्यातीलच आणि इतर तालुक्मयांतील कन्नड दुराभिमानीच अधिक दिसत होते.
येणाऱया कार्यकर्त्यांच्या व संघटनांच्या वाहनांचा क्रमांक हा परजिह्यातीलच होता. यावरूनच कार्यकर्त्यांना आयात केल्याचे दिसून येत होते. या मिरवणुकीमध्ये कोणतीही शिस्त पाळली जात नव्हती. लाल-पिवळा ध्वज घेऊन केवळ घोषणाबाजी देत हिडीस प्रकारच सुरू होते. कित्तूर चन्नम्मा चौक येथे राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालण्यासाठी कृत्रिम जिन्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावर काही कन्नड कार्यकर्ते चढून कित्तूर चन्नम्मांना हार अर्पण करत होते. तर याच ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी हे येणाऱया चित्ररथ मिरवणुकीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते. यावेळी ते कन्नड कार्यकर्त्यांना खाली उतरण्याची सूचना करत होते. मात्र कन्नड कार्यकर्ते उद्धटपणे बोलत होते. यावर वादावादीही झाली. एकूणच बेशिस्तपणाचा कळस मिरवणुकीत आढळून आला.
शेतकरी उपाशी आणि राज्योत्सव तुपाशी
राज्योत्सव मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यात आली. बेळगावात राज्योत्सव दिन साजरा करण्यासाठी सरकारने विशेष निधी दिला होता. याचबरोबर काही सरकारी विभागाकडूनही पैसा जमा करण्यात आला होता. संघ-संस्थांकडूनही जबरदस्तीने विविध प्रकारचे आयोजन करून घेण्यात आले होते. आयोजन केले नाही तर कारवाई करू, असा छुपा इशाराही देण्यात आला होता. यामुळे नाईलाजास्तव काहींनी मिरवणुकीला मदत केली.
शेतकरी ऊस बिलासाठी तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. त्यांना अजूनही नुकसानभरपाई दिली गेली नाही. तसेच योग्य ऊस दर जाहीर केला नाही. मात्र राज्योत्सव साजरा करण्यामध्ये जिल्हा प्रशासनाने आणि सरकारने धन्यता मानली आहे. त्यामुळे ‘शेतकरी उपाशी आणि राज्योत्सव तुपाशी’ अशा भावना शेतकऱयांनी व्यक्त केल्या आहेत.
रुग्णवाहिकांनाही मिळाला नाही मार्ग
कित्तूर चन्नम्मा चौकाजवळच सिव्हिल हॉस्पिटल आहे. याचबरोबर या रस्त्यावरूनच केएलईला ये-जा करावी लागते. सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अनेक खासगी हॉस्पिटल्स आहेत. त्या ठिकाणी अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. मात्र ये-जा करण्यासाठी मार्गच नव्हता. एक तर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून सर्वच रस्ते बंद केले होते. यातच परजिह्यातून आलेल्या कन्नड दुराभिमान्यांमुळे रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला. अक्षरशः या सर्वांनी लाखोली वाहिली. यापुढे कॉलेज रोड तसेच कित्तूर चन्नम्मा चौक आणि धर्मवीर संभाजी चौक येथील मिरवणूक बंद करून महांतेशनगर परिसरात किंवा बॉक्साईट रोड परिसरात मिरवणुकीला परवानगी द्या, अशी मागणी जनतेतून होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बंदी घालावी. कारण यामुळे सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून यापुढे शहराच्या बाहेरच व्यासपीठ घालून राज्योत्सव साजरा केल्यास बरे होईल, अशाच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.









