तेरा दिवसात गेले 769 बळी : बरे होण्याच्या प्रमाणात होतेय वाढ : दिवसभरात 2266 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाबळींची संख्या वाढतच असल्यामुळे संपूर्ण राज्यावरच जसे काही सुतकी सावट पसरले आहे. ऑक्सिजन पुरवठय़ातील घोळ आणि प्रशासकीय तसेच राजकीय असमन्वयाचेच हे बळी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारच्या नावाने बोटे मोडण्याशिवाय जनतेच्या हाती काहीच राहिलेले नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आहेत.
गुरुवारी राज्यात 63 रुग्णांचे बळी गेले आहेत. तत्पूर्वी मंगळवारी 75 तर बुधवारी 70 मिळून केवळ दोन दिवसात 145 रुग्ण दगावले होते. त्यात गुरुवारी आणखी 63 जणांची भर पडली आहे. गत 13 दिवसात बळी गेलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 769 एवढी झाली आहे.
कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गत दोन दिवसात रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. बुधवारी 2865 बाधितांमधील 2840 जण बरे झाले होते तर गुरवारी 2491 बाधित सापडले असून त्यातील 2266 जण बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 130130 वर पोहोचली आहे तर एकूण 95240 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 73.19 टक्के आहे. गत 24 तासात 248 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 2243 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सध्या 32953 सक्रिय रुग्ण आहेत. वर्षभरातील बळींची संख्या 1937 एवढी झाली आहे.
मडगावातील रुग्णसंख्येत किंचित घट
रुग्णसंख्येच्या बाबतीत गेल्या कित्येक दिवसांपासून मडगाव केंद्र आघाडीवर असले तरी गुरुवारी त्यात सुमारे 350 चा उतार येत 2499 वर पोहोचली आहे. त्याखालोखाल कांदोळी केंद्रात 1884 तर पणजी केंद्रात 1827 रुग्ण आहेत. त्याशिवाय फोंडा केंद्रात 1782, पर्वरग्नी 1668, म्हापसा 1507, सांखळी 1473, कुठ्ठाळी 1425, चिंबल 1306, पेडणे 1290, शिवोली 1163, वाळपई 1018, कासावली 1017, असे चार अंकी संख्येने रुग्ण दाखल आहेत. राज्यातील 33 पैकी सर्वात कमी 249 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.
केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या
डिचोली 818, सांखळी 1473, पेडणे 1290, वाळपई 1018, म्हापसा 1507, पणजी 1827, हळदोणा 834, बेतकी 795, कांदोळी 1884, कासारवर्णे 249, कोलवाळ 730, खोर्ली 908, चिंबल 1306, शिवोली 1163, पर्वरी 1668, मये 336, कुडचडे 818, काणकोण 488, मडगाव 2499, वास्को 923, बाळ्ळी 527, कासावली 1017, चिंचिणी 487, कुठ्ठाळी 1425, कुडतरी 623, लोटली 901, मडकई 615, केपे 575, सांगे 533, शिरोडा 693, धारबांदोडा 597, फोंडा 1782 व नावेलीत 640 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 4 बाधित सापडले आहेत.
13 मे रोजीचे नवे रुग्ण 2491
13 मे पर्यंतचे एकूण रुग्ण 130130
13 मे रोजी बरे झालेले रुग्ण 2266
13 मे पर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण 95240
13 मे पर्यंतचे सक्रिय रुग्ण 32953
13 मे रोजीचे बळी 63
वर्षभराती एकूण बळी 1937









