मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण उर्वरित प्रकल्पग्रस्तांची मोबदला रक्कम : खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश : नागेंद्र परब, संजय पडते यांची माहिती
वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या रत्नागिरी ते सिंधुदुर्ग जिल्हय़ातील भूसंपादनातील पुरवणी यादीमधील प्रकल्पग्रस्तांना येणे बाकी असलेला नुकसानीचा 130 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. दोन्ही जिल्हय़ातील संबंधित प्रकल्पग्रस्तांना तो मोबदला लवकरच जिल्हा प्रशासनामार्फत वितरित केला जाईल. हा उर्वरित निधी मिळविण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा केला, अशी माहिती जि. प. गटनेते नागेंद्र परब व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी येथे दिली.
येथील शिवसेना शाखा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. भूसंपादनाच्या दुसऱया पुरवणी यादीतील प्रकल्पबाधित शेतकऱयांना जमिनीचा व अन्य बाधित मिळकतीचा मोबदला अजून मिळाला नव्हता. त्यामुळे काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम रेंगाळले होते. याबाबत प्रकल्पग्रस्तांनी वेळोवेळी निवेदने दिली होती. आंदोलनेही केली होती तसेच खासदार राऊत यांचे लक्ष वेधले होते. प्रकल्पग्रस्त मोबदल्याचा होणारा विलंब व चौपदरीकरणाच्या कामात अडथळा लक्षात घेऊन त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याप्रश्नी पाठपुरावा केला होता. अखेर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रकल्पबाधित शेतकऱयांचे 130 कोटी रुपये केंद्राकडून राज्याला प्राप्त झाले आहेत. यात कुडाळ तालुक्मयातील 84.67 कोटी, राजापूर येथील फ्लायओव्हरसाठी 24 कोटी, तर अन्य भागातील 21.33 कोटी रुपयांचा समावेश आहे. राऊत यांच्या प्रयत्नातून आणि गडकरी यांच्या माध्यमातून ही रक्कम प्राप्त झाली, असे परब यांनी सांगितले.
पडते म्हणाले, हायवेच्या प्रकल्पबाधित शेतकऱयांना पैसे मिळावेत, यासाठी राऊत प्रयत्नात होते. हे पैसे मिळतील की नाही? याबाबत शेतकऱयांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु राऊत यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी राज्याला मिळाला.
पालकमंत्र्यांचा प्रशासनावर चांगला वचक!
गेली तीन वर्षे कुडाळ येथील भंगसाळ बंधाऱयाच्या रखडलेल्या कामाकडे पालकमंत्री उदय सामंत यांचे येथील शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांनी तेथे भेट देऊन अधिकाऱयांना सूचना केल्यानंतर काम सुरू करण्यात आले. बंधाऱयाचे काम सुरू झाल्यामुळे पावशी ग्रामस्थ व कुडाळ येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनावर अंकुश कसा असावा? हे पालकमंत्री सामंत आपल्या कामातून दाखवून देत असल्याचेही पडते यांनी सांगितले.









