शाहुवाडी : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा प्रबळ करण्यासाठीच दौरा सुरू आहे. प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक बघत नसलेल्या या सरकारची बेबंदशाही सुरू असल्याचा तसेच राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत का ? असा खोचक सवालही यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या जागा कमी आल्या अन्यथा बँकेचा अध्यक्ष हा वारणेतच ठरला असता असा टोलाही त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालाबाबत दिला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शाहूवाडी तालुक्याचा दौरा केला याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते मलकापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रविण प्रभावळकर यांनी स्वागत केले. प्रारंभी त्यांनी येळाणे येथील महिपती पाटील, मलकापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक विजय भिंगार्डे, प्रकाश भिंगार्डे यांच्या घरी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर लाड, आबा देशपांडे, सुरेश पोतदार, पंडित विभुते ,संजय वाकडे आदी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून तिळगुळ वाटप केले. विविध विषयावर चर्चा केली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते चेतन गुजर यांच्या घरी महेश विभुते, उत्तम शिगंटे, रूपेश वारंगे, महेश गांगण आदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.
यानंतर माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, भारत गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभार आणि अनुपस्थिती बद्दल चांगलाच टोला लगावला. या सरकारला सत्तेची आस असून ते सत्ताप्रिय आहे. त्यांना जनतेच्या कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य नाही. सरकारमध्ये कुणाचा कुणात पायपोस नाही. मुंबईचे कमिशनर सकाळी कोरोनाबाबत माहिती देतात तर रात्री मुख्यमंत्री संचारबंदी लावतात. म्हणजे नेमकं चालल आहे तरी हे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीबाबतच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले असता राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत का ? असा खोचक सवाल त्यांनी केला. राज्याला मुख्यमंत्री नेमके कोण आहेत हेच समजत नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की आमच्या काही जागा त्यांनी पाडल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला घराणेशाहीची ओढ अधिक आहे. म्हणूनच जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्याच वारसदारांना पुढे आणले असल्याचा टोलाही त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, व खासदार संजय मंडलिक यांना लगावला.
जिल्हा बँक निवडणुकीच्या चर्चा बाबतचे सर्वाधिकार हे आमदार विनय कोरे यांना दिले आहेत. त्यामुळे ते काहीतरी चमत्कार करतील असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला एकूणच सध्याचे सरकार हे बेबंदशाहीने सुरु आहे. तत्कालीन सरकारच्या काळात इतकी बेबंदशाही नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्याचा त्यांनी यावेळी नामोल्लेख करत या सरकारला दाखला दिला.
याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष विजय रेडेकर, माजी नगरसेवक अशोक देशमाने, उदय देसाई, नाथाजी पाटील, दाजी चौगुले, बाजीराव पाटील, महिपती पाटील, पोपट दळवी, संजय खोत, विवेक चव्हाण, नामदेव पाटील, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.