आज-उद्या घरोघरी जाऊन डोस पाजणार
प्रतिनिधी / पणजी
आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभर रविवारी पाच वर्षापर्यंतच्या मुलांना पल्स पोलिओ डोस देण्यात आला. पोलिओच्या लसीकरणाची राज्यात एकूण 654 केंदे असून रविवारी राज्यातील सुमारे 97.61 टक्के मुलना पोलिओ डोस देण्यात आला, अशी माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. जोस यांनी दिली.
डॉ. जोस म्हणाले, रविवारी राज्यातील सुमारे 1 लाख 14 हजार 750 मुलांमधील 1 लाख 12 हजार 13 मुलांना पोलीओचा डोस देण्यात आला. यातील उत्तर गोव्यात 49 हजार 473 मधील 49 हजार 49 मुलांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. दक्षित गोव्यातील एकूण 65 हजार 277 मुलांमधील 62 हजार 964 मुलांपर्यंत पोलिओ डोस पोचला आहे. तसेच पाच वर्षांवरील 731 मुलांना यावेळी लसीकरणही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढील दोन दिवस पोलीओ डोस राज्यात सुरू असणार असून सोमवार व मंगळवारी घराघरात जाऊन उरलेल्या मुलांना डोस देण्यात येणार आहे. पोलिओचे डोस दरवषी दोन वेळा दिला जातो. आपला देश जरी पोलिओमुक्त असला तरी अन्य देशामध्ये पोलिओची साथ आजूनही आहे. त्यामुळे पोलिओचे दोन डोस हे प्रत्येक मुलासाठी गरजेचे असून त्याकडे दुर्लक्ष न करता लोकांनी त्याचे महत्व जाणून घेऊन मुलांना ते द्यायला हवे, अशा आशयाचे बोर्ड लावून तसेच संदेश प्रत्येकापर्यंत पोचवून पोलिओ डोससाठी आपल्या मुलांना घेऊन येण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे केले होते.









