एकूण रुग्णसंख्या 6 हजार 824 : शनिवारी तिघांचा मृत्यू : 209 संसर्गमुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. त्यामुळे कर्नाटक देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 व्या स्थानावर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 6,824 इतकी आहे. तर मृतांची संख्या 81 वर पोहोचली आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 308 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 209 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 3,648 इतकी असून सक्रिय रुग्णसंख्या 3,092 इतकी आहे. दरम्यान, मागील 24 तासांत बेंगळूरमधील दोन तर धारवाड जिल्हय़ातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रम लागतो. त्यानंतर नवव्या स्थानी कर्नाटक आहे. मागील आठवडाभरापासून कर्नाटकात कोरोनाबाधितांचे मृत्यू होत आहेत. शनिवारी देखील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 308 नवे रुग्ण आढळले आहेत. गुलबर्गा जिल्हय़ात 67, यादगिरमध्ये 52, बिदरमध्ये 42, बेंगळूर शहर 31, मंगळूर 30, धारवाड 20, उडुपी 14, हासन आणि बळ्ळारीत प्रत्येकी 11, विजापूर 6, रायचूर व कारवारमध्ये प्रत्येकी 5, कोलार 4, दावणगेरे 3, मंडय़ा व हावेरीत प्रत्येकी 2 तसेच म्हैसूर, बागलकोट आणि रामनगर जिल्हय़ात प्रत्येकी एक नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 208 जण परराज्यातून तर 25 जण विदेश प्रवास करून आलेले आहेत.
बेंगळुरात 10 दिवसांत 16 बळी
बेंगळूर शहरात मागील 10 दिवसांत 16 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 239 जणांना संसर्ग झाला आहे. मे महिन्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच बेंगळूर शहर जिल्हय़ात जून महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 648 इतकी आहे. त्यापैकी 299 रुग्ण बरे झाले आहेत. तर 319 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात एकूण 29 जणांचे कोरोनामुळे बळी गेला आहे.
उडुपी जिल्हय़ात रुग्णसंख्या हजार पार
उडुपी जिल्हय़ात कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात संसर्ग झाला आहे. परराज्यातून आलेल्यांमुळे येथे बाधितांची संख्या 1000 पार झाली आहे. रुग्णसंख्या हजार पार होणारा उडुपी हा कर्नाटकातील पहिला जिल्हा आहे. शनिवारी या जिल्हयात 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवार अखेरपर्यंत या जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या 1005 इतकी होती. दिवसभरात 110 जण संसर्गमुक्त झाले असून बरे झालेल्यांची संख्या 584 वर पोहोचली आहे. म्हणजेच 50 टक्क्याहून अधिक रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत.









