11 पालिकांची मुदत 4 नोव्हेंबरला संपुष्टात : जिल्हा पंचायत निवडणूकही एकाचवेळी घेण्यावर सरकारचा विचार
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 11 नगरपालिकांची मुदत 4 नोव्हेंबर 2020 रोजी संपुष्टात येत असून नवी लोकनियुक्त मंडळे निवडण्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. दरम्यान राज्यात स्थगित झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुका देखील एकाचवेळी घेण्यावर सरकारने विचार चालविला आहे.
फोंडा व सांखळी निवडणुका आणखी दोन वर्षांनी
राज्यातील पेडणे, म्हापसा, डिचोली, वाळपई, सांगे, केपे, कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडे, मडगाव व मुरगाव या पालिकांवरील मंडळाची मुदत येत्या 4 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. डिचोली वगळता सर्वच पालिका मंडळांवरील नगराध्यक्ष बदलले. डिचोलीला मात्र राजकीय स्थैर्य लाभले. राज्यात 13 पालिका आहेत व 1 महानगरपालिका आहे. त्यातील 13 पैकी फोंडा व सांखळी या दोन पालिका मंडळाच्या निवडणुका आणखी दोन वर्षानी घेण्यात येणार आहेत. तत्पूर्वी या 11 पालिका मंडळांची मुदत संपण्याच्या 15 दिवस अगोदर निवडणूक घेणे हा नियम आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी प्रस्ताव राज्य सरकारकडे काही महिन्यांपूर्वी पाठविला होता. राज्य सरकारने 18 ऑक्टोबर ही तारीख निवडणुकीसाठी निश्चित केलेली आहे.
निवडणुका घेणे शक्य होईल काय ?
सप्टेंबरच्या अखेरीस राज्यात पालिका मंडळांच्या निवडणुकीसाठीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. तथापि सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असल्याने निवडणुका घ्यायच्या की नाही ! या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घ्यावयाच्या शिल्लक आहेत. निवडणुक प्रक्रिया सुरू झालेली असताना केवळ मतदानाला 3 दिवस असतानाच राज्य सरकारने निवडणूक स्थगित केली होती. आता ही निवडणूक राज्यातील पालिका निवडणुकीबरोबरच घेण्याबाबत सरकार विचार करीत आहे. गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या निवडणुका ऑक्टोबरच्या 18 रोजी होतील का ? याबाबत शंका आहे. जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोपर्यंत या निवडणुका घेणे सरकारला शक्य होणार नाही.
पालिका प्रभागांच्या पुनर्रचनेचे काम प्रलंबित राज्य निवडणूक आयोगाने सहा महिने अगोदरच पालिका संचालकांना पत्र पाठवून पालिका प्रभागांच्या पुनर्रचनेचे काम हाती घेण्याची सूचना केली होती. मात्र उपलब्ध माहितीनुसार अद्याप हे काम हाती घेण्यात आलेले नाही. 13 पैकी 11 पालिकांच्या निवडणुका या वेळेतच व्हाव्या यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रयत्न चालविले आहेत.









