गोंयचा राखणदार’ची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ म्हापसा
राज्य सरकारने येत्या डिसेंबर 27, 28 व 29 असे तीन दिवस जागतिक पातळीवरील सनबर्न महोत्सव करण्याचा निर्धार केला असता तरी आम्ही हा महोत्सव कोणत्याच परिस्थितीत करू देणार नाही. गरज भासल्यास राज्यभरातील सर्व नागरिकांना एकत्रित करून हा 3 दिवसीय महोत्सव उधळून लावू असा गंभीर इशारा गेंयचे राखणदारच्या पदाधिकाऱयांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. सनबर्न ही आमची संस्कृती नसून पर्यटनाच्या नावाखाली गोमंतकीयावर लादलेली असभ्य कृती असल्याचा आरोपही यावेळी पदाधिकाऱयांनी दिला. प्रसंगी आम्ही सनबर्नला विरोध करण्यासाठी रस्त्यावरही उतरू असे ते म्हणाले. दि. 27 डिसेंबर रोजी सुरू होणाऱया या महोत्सवाला राज्यातील सर्व नागरिकांना एकत्रित करून या महोत्सवाला आम्ही विरोध करणार असल्याची माहिती या संस्थेचे समन्वयक दिपेश नाईक व विल्बर टिकलो यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर राखणदारचे सुधाकर नाईक, सुभाष केरकर, अमृत आगरवाडेकर, हरिश्चंद्र नाईक, गुरुदास भाटलीकर, आल्बर्ट तावारीस, नारायण बेळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हा मुर्खपणाचा कहर
देशात पर्यायाने राज्यात कोरोनाचा कहर चालूच आहे अशा परस्थितीत राज्यातील शाळा हायस्कूल सुरू करण्याचा सरकारचा विचार मुर्खपणाचा कळस असल्याचे दिपेश नाईक यांनी सांगितले. सरकारचे जनतेच्या आरोग्याकडे लक्ष नसून केंद्राकडून मिळणाऱया कोविड फंडाकडे असल्यानेच कोरोना बाधितांच्या उपचारांकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान लॉकडाऊनच्या दीड महिन्यांच्या सुरक्षित काळानंतर राज्याच्या सीमा खुल्या करताच वास्कोपासून इतर शहरे तसेच ग्रामीण भागातही कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला मात्र मुख्यमंत्र्यांनी “भिवपाची गरज ना’’ असे सांगत जनतेची दिशाभूल केल्याचे अमृत आगरवाडेकर म्हणाले.
अटक करून घेण्यासाठी मागे राहणार नाही
राज्यातील सरकार सर्व बाजूंनी सपशेल फेल ठरल्याचे विल्बर टिकलो यांनी सांगितले मात्र पॅसिनोंना हिरवा कंदील दाखवित ड्रग्ज माफियांना सुरक्षा देण्याचे तंत्र सरकारकडून अवलंबिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हणजूण वागातोरात सनबर्न सारख्या फेस्टिवलला मंजुरी दिल्यास गोव्यातील तमाम स्वयंसेवी संस्था तसेच कानाकोपऱयात वसलेले गोंयचे राखणदार या गोष्टीचा प्राणपणाने विरोध करणार असल्याचे टिकलो यांनी सांगितले. मागील वर्षाप्रमाणे शेवटच्या वेळेत सनबर्नला सरकारकडून परवानगी मिळाल्यास गोंयच्या राखणदार संस्थेची नेमकी भूमिका काय असेल या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपण आयोजनस्थळी पोलिसांकडून अटक करून घेण्यासही मागेपुढे पाहाणार नसल्याचे टिकलो यांनी यावेळी स्पष्ट केले.
सुभाष केरकर यांनी पर्यटन मंत्रीपद सांभाळणाऱया उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा सनबर्न कार्यक्रमात नाचगाणे करण्याची घाई लागून गेल्याचे सांगितले. सनबर्नच्या नावाने कमिशन खाण्याचा सरकारचा डाव गोंयचे राखणादार कुठल्याही परिस्थितीत उधळून लावणार असल्याचा इशारा शेवटी केरकर यांनी दिला.









