पुणे / प्रतिनिधी
राज्यात 1 जूनपासून पुन्हा 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढविण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच जाहीर करतील. पॉझिटव्हिटी रेट जास्त असणाऱया जिह्यामध्ये पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवला जाईल. मात्र, रुग्णसंख्या कमी असणाऱया जिह्यांमध्ये नियम शिथिल करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राजेश टोपे हे पुण्यात साखर संकुलातील बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत लागू केला गेला. मात्र, ज्या ठिकाणी कोरोनाबधितांची संख्या कमी झाली आहे, त्या ठिकाणी 1 जूनचा लॉकडाऊन पुढे वाढवणार का, याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय जाहीर करणार आहेत. सरासरी उपलब्ध बेडच्या संख्येनुसार काही गणिते ही ठरविण्यात आली आहेत. पॉझिटिव्हिटी रेट अजूनही अधिक आहे, त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाउन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, जिथे कोरोनाची परिस्थिती आटोक्मयात आहे तिथे काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही. काही ठिकाणी दुकानाची वेळ वाढविण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावेत. एकूण 131 रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत. तसेच म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन टाकते त्याप्रमाणेच वाटप केले जात आहे. इंजेक्शन्स उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होत आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यात म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन्सचे उत्पादन सुरू केले आहे. त्याबद्दल आपण गडकरिंचे अभिनंदन करतो. त्यामुळे महाराष्ट्राला मोठÎ प्रमाणावर इंजेक्शन्स मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंमत असेल, तर राज्य सरकारने दोन दिवसाचे अधिवेशन घ्यावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अधिवेशन आम्ही नेहमीच घेत आलो आहोत. सर्व विषयावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. जे वैधानिक विषय आहेत, ते आम्ही घेणारच आहोत. आम्हाला लोकांची आणि लोकप्रतिनिधींचीही काळजी आहे. फक्त आम्ही शास्त्रीय पद्धतीने विचार करतो, असा चिमटा त्यांनी काढला.
ग्लोबर टेंडरच्या मुद्दयावर केंद्राने हस्तक्षेप करा
ग्लोबल टेंडर काढले आहे. पण त्यात तांत्रिक मुद्दे निर्माण झाले आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात केंद्रानेही हस्तक्षेप केला पाहिजे. हा सर्व विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे. लसीकरणाला लागणारा निधी आम्ही तयार करून ठेवला आहे. एका चेकने सर्व रक्कम द्यायला आम्ही तयार आहोत. हे आम्ही वारंवार सांगत आहोत. आता फक्त केंद्राने लस द्यायला हवी, असे त्यांनी सांगितले. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत देशात अजून कोणतेही धोरण ठरलेले नाही. मात्र, तिसऱया लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही त्याची सगळी तयारी करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन रद्द
पुण्यातील स्थिती सुधारत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांबाबतचा लाकडाउन रद्द करण्यात येत आहे. आता अत्यावश्यक सेवा सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. त्या 7 ते 11 मध्येच सुरु रहातील, असेही त्यांनी जाहीर केले.








