प्रतिनिधी/ पणजी
सरकारने लॉकडाऊन केल्याचे चांगले परिणाम म्हणून कोविड-19 च्या रुग्णांची संख्या आता मर्यादित राहिली आहे. जे नवे दोन रुग्ण सापडले त्यातील एक स्वतःच विलगीकरणमध्ये होता तर दुसरा जो अगोदर सकारात्मक सापडला होता, त्याचाच भाऊ आहे. राज्यतील किराणामालाची दुकाने 24X7 खुली राहतील व खाद्यान्नाचा साठा करणाऱयांनी आपल्या गोदामातील माल बाहेर काढावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत एका पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य सरकारने एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे दक्षिण गोव्यात नव्याने जिल्हा इस्पितळात एक विभाग विलगीकरणासाठी वापरला जाणार आहे. राज्यात कोविड-19 च्या संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने पृथक्करणासाठी पुण्याला पाठविले जात होते. आजपासून गोव्यात प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्याने आजपासून गोव्यातच त्याची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कदंब बसद्वारे ‘फुडबस’ योजना
गोवा सरकारने रविवारपासून कदंब बसद्वारे ‘फुडबस’ योजना सुरू केली आहे. जी माणसे विशेषतः मजूरवर्ग गोव्यात अडकलेला आहे त्यांना खाद्यपदार्थ पुरविले जातील.
अडिच लाख मजुरांसाठी सरकारतर्फे प्रयत्न
राज्यात सुमारे दोन ते अडीच लाख मजूर आहेत. जे आपापल्या राज्यात परत जाऊ पाहत आहेत. परंतु त्यांनी इथेच रहावे. त्यांच्या खाण्याजेवण्याची व्यवस्था राज्य सरकार करील. राज्यातील कित्येक हॉटेल चालकांना हॉटेल, रेस्टॉरंट चालू करू नका. परंतु त्यांनी आपले स्वयंपाकघर चालू करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अनेक नामांकित हॉटेल चालकांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला. आजपासून काही हॉटेलचालकांनी अन्न शिजवून तयार करून देऊ, असे आश्वासन सरकारला दिले आहे. जेणेकरून गोव्यात अडकलेल्या काही पर्यटकांचीदेखील होय गोवा सरकार करील.
दरवाढ व साठेबाजी करणाऱयांवर कारवाईचा इशारा
राज्यातील काही व्यापारी अडचणीच्या काळात ग्राहकांकडून दामदुपटीने मालाची विक्री करत असल्याचा तक्रारी आहेत. तसे कोणी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीदेखील काही घाऊक विक्रेते आपल्या गोदामातील माल बाहेर काढीत नाहीत. सोमवारपर्यंत त्यांनी माल बाहेर काढला नाही तर नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी छापा टाकतील व सर्व माल ताब्यात घेतील, असा गंभीर इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
रस्ते अडवू नका
काही गावांमध्ये जनतेला प्रवेश नाकारण्यात आलेला आहे व ग्रामस्थांनी रस्ते अडविले आहेत. हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह आहे. आमची पोलीस यंत्रणा काम करतेय. अत्यावश्यक वेळी रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या गाडय़ाही जाणाऱया असल्याने रस्त्यांवरील सर्व अडथळे आज दूर केले जातील. एका गावातून दुसऱया गावात नागरिकांनी जाऊ नये यासाठी पोलिसांनीच अडथळे तयार केलेले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सामान खरेदीसाठी एकेकटे चला
जीवनावश्यक सामानाची खरेदी करायची असल्यास पोलीस अडविणार नाहीत. एकेकटय़ानेच जावे. तसेच सामान खरेदीसाठी कमीत कमी गाडीचा वापर करावा व एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
….तर गोवा सुरक्षित झोनमध्ये
14 एप्रिलपर्यंत आम्हाला लॉकडाऊन ठेवायचे आहे. दरम्यानच्या काळात कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत भर पडता कामा नये व तसे झाल्यास गोवा कोविडच्या धोक्यापासून सुरक्षित झोनमध्ये पोहोचला असे समजण्यास हरकत नाही. त्यासाठी जनतेने पूर्ण सहकार्य द्यावे. घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गेल्या 24 तासांतील जे दोन रुग्ण सापडले त्यातील एक अगोदर पॉझिटीव्ह सापडलेल्या रुग्णाचा भाऊ व दुसरी व्यक्ती ज्याने स्वतःलाच विलगीकरणामध्ये ठेवले होते. राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आपण मुख्यमंत्री असलो तरी स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे आपल्याला संभाव्य परिस्थितीची कल्पना आहे. त्यामुळे जनतेने घराबाहेर पडू नये. थोडे दिवस कळ सोसा. जीवनावश्य वस्तूंची खरेदी करणाऱयांना पालीस अडविणार नाहीत. सीआरपीएफचे जवान कोणालातरी बडवीत असल्याचे व्हिडिओ दाखविले जातात. त्यातील काही शेजारील राज्यातील जुने व्हिडिआदेखील आहेत. हे जवान गोव्यातच असतात व जनतेला त्रास देण्यासाठी नव्हे तर जनतेला सहकार्य करण्यासाठी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारी कर्मचाऱयांनी सहकार्य करावे
कोविड-19 मध्ये येणाऱया रुग्णांच्या उपचारार्थ राज्य सरकार निधी उभारीत आहे व त्यासाठी अनेक उद्योग, कंपन्यांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन सरकारला दिलेले आहे. सर्व मंत्री व आमदार एक महिन्याचे वेतन या देतील. आयएएस अधिकाऱयांनी एकत्रित येऊ स्वतःचा एक निधी उभारून सरकारला देण्याचे ठरविले आहे. याशिवाय राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱयांनी किती मदत द्यावयाची हे स्वतःच पुढाकार घेऊन ठरवावे. सरकार आज एका बँकेत याकरिता खाते उघडणार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना दक्षिण गोव्यात चार व उत्तर गोव्यात विलगीकरणासाठी पाच ठिकाणी केंद्रे उघडण्यात आलेली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मरण पावलेली महिला कोविडची नाही खोटी बातमी देणाऱयांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले
कोविड-19 मुळे 68 वर्षांची महिला गोमेकॉत मरण पावल्याचे वृत्त प्रसिद्ध करणाऱया वर्तमानपत्राला मुख्यमंत्र्यांनी फटकारले. चुकीची माहिती कृपया देऊ नका. वृत्तपत्रांनी अकारण अफवा पसरविण्याचे काम करू नये. तसे असते तर सदर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देता येत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांचेही स्पष्टीकरण
68 वर्षीय संशयित महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही स्पष्ट केले आहे. या रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. सदर महिला रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होता. पण तिचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
सीआरपीएफ जवानामुळे दहशत
गोव्यातील रस्त्यांवर ठिकठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आल्याने आता रस्त्यावर फिरणाऱयांना दहशत बसली आहे. काल सकाळीच लॉकडाऊन न जुमानता बाहेर पडलेल्यांना जवानाच्या दंडुक्याचा मार खावा लागला. पणजी, म्हापसा यासह अन्य विविध भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱयांना जवानांनी दंडुक्याचा प्रसाद दिला. त्याचबरोबर रस्त्यावरून बेडूकउडय़ा, माकडउडय़ा मारत जायला लावले. स्थानिक पोलिसांना उलट उत्तरे देणाऱयांवर यामुळे लगाम बसला आहे. राज्य सरकरने खास विनंती करून केंद्राकडून सीआरपीएफचा ताफा मागितला होता. मात्र तैनात करताच या जवानांनी दहशत निर्माण केली.
राज्यातील अनेक दुकानांमध्ये खाद्यान्नचा तुटवडा
अनेक दुकानांमध्ये खाद्यान्नाचा प्रचंड तुटवडा असल्याने राज्यातील बहुतांश दुकाने अद्याप बंदच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे सलग दुसऱया दिवशीही हाल झाले आहेत. राज्यातील नागरिकांना सध्या जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी फार मोठय़ा प्रमाणात आटापिटा करावा लागतो. अनंत अडचणीतून काही जणानांच अत्यल्प किराणा सामान हाती लागते. मुख्यमंत्र्यांनी सर्व किराणा दुकाने खुली करण्याचे आदेश दिल्यानंतरही व्यापारीवर्ग दुकाने उघडण्यास राजी नाहीत. पोलिसांनी दोन-तीन दिवस दंडुकेशाही दाखविल्यानंतर व्यापारीवर्गाला दुकाने खोलण्याचा धीर होत नाही मात्र त्यांच्या दुकानातील बराचसा माल काही नागरिकांनी विकत घेऊन आपापल्या घरी साठा केला असल्याने अनेक बारीकसारीक नागरिकांना खाद्यान्नाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे सध्या हाल झालेले आहेत