नवा कायदा जारी करणार : गृहमंत्री बसवराज बोम्माई : बेंगळुरात पत्रकारांशी संवाद
प्रतिनिधी/ बेंगळूर
ऑनलाईनसारख्या गेम्समुळे अनेक युवकांचा बळी गेला आहे. यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशातून राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑनलाईन गेम्सवर निर्बंध घालण्यासाठी लवकरच नवा कायदा जारी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री बोम्माई पुढे म्हणाले, देशातील अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन गेम्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तेथील सरकारने कोणकोणते नियम आणि कायदा जारी केला आहे, याबाबत अभ्यास सुरू आहे. लवकरच राज्यातही ऑनलाईन गेम्सवर निर्बंध घालण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी ऑनलाईन गेम्समुळे युवक घर, संपत्ती, पैसा गमावून रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा गेम्सवर निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी सरकारकडे केली आहे, अशी माहितीही मंत्र्यांनी यावेळी दिली. युवकांनी ऑनलाईन गेम्समुळे कायद्याविरोधात उपक्रम हाती घेत आहेत. यावर नियंत्रण न आणल्यास युवा जनतेला गमविण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालण्याचा पुढाकार घेतला आहे. वेगवेगळय़ा राज्यातील कायद्यांचा अभ्यास करण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. तेथील नियम जाणून घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर तात्काळ ऑनलाईन गेम्सवर निर्बंध घातल्याचा आदेश जारी करण्यात येणार आहे, असे बोम्माई यांनी सांगितले.
पोलिसांना मुक्त स्वातंत्र्य
दिल्याने कारवाई
अमली पदार्थाबाबत पोलीस खाते निर्भयपणे छापा टाकून कारवाई करीत आहे. मागील कोणत्याच सरकारने हाती न घेतलेली कारवाई आम्ही करीत आहे. तसेच अमली पदार्थ प्रकरणात कोणाचाही समावेश असल्यास त्यांना बचाव करण्याचा प्रश्नच नाही. दररोज एक-दोन एफआयआर दाखल करण्यात येत असून सदर प्रक्रिया निरंतर सुरू आहे. पोलिसांना मुक्त स्वातंत्र्य दिल्याने अनेकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे, असेही बोम्माई म्हणाले.









