प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून रविवारी हा आकडा 151 वर जाऊन पोहोचला. रविवारी राज्यात कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ात 4, बेंगळूरमध्ये 2 आणि बळ्ळारीत 1 रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य खात्याने सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 22 मार्च रोजी दुबईवरून परतलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या संपर्कात आल्याने पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. बेंगळूरमध्ये आतापर्यंत 57 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 10 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. बळ्ळारीतही दिल्लीतील तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या 6 झाली आहे. राज्यात एकूण 12 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.









