प्रतिनिधी
बेंगळूर
कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने बेंगळूरसह राज्यातील काही जिल्हय़ात कठीण लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. मात्र, सदर लॉकडाऊन शेवटचे आहे. राज्यात यापुढे कोणत्याही जिल्हय़ात लॉकडाऊन जारी करणार नाही, अशी माहिती मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली. म्हैसुरात त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
मंत्री सोमशेखर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी यापूर्वीच लॉकडाऊन जारी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेली घरे सीलडाऊन करण्यात येतील. त्याचबरोबर दोन-तीन घरांमध्ये बाधित रुग्ण आढळून आल्यास सदर गल्ली सीलडाऊन करण्यात येणार आहे. मात्र, सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात येणार नाही, असे त्यांनी सांगितले.









