सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन : मयेतील युवानेते प्रेमेंद्र शेट यांचा मगो पक्षात प्रवेश : राजकारणात अराजकता आणणारे नरकासुर नष्ट करूया.
प्रतिनिधी /डिचोली
मगो गोमंतकाच्या मातीतील पक्ष असून आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. या पक्षाला संपविणे तसे सोपे नाही. आज लोकांनी दिवाळीत उत्सवात नरकासुर ज्याप्रमाणे दहन करून नष्ट केले तसेच राजकारणात अराजकता माजविणाऱया राजकीय नरकासुरांना आणि तशा वृत्तीला नष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी घराघरात मगो पक्षाची ज्योत पेटविण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मगो पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी मये येथे केले.
कुंभारवाडा मये येथील श्री सातेरी मंदिराच्या सभामंडपात आयोजित खास कार्यक्रमात युवानेते तथा मयेचे पंच सदस्य प्रेमेंद्र शेट यांनी मगो पक्षात प्रवेश केला. या सोहळय़ात ढवळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी आमदार तथा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नरेश सावळ, कार्याध्यक्ष ऍड. नारायण सावंत, मांदेचे उमेदवार जीत आरोलकर, प्रसाद कुंडईकर, कारापूर सर्वणचे पंच सदस्य योगेश पेडणेकर, कुडचडेचे उमेदवार आनंद प्रभुदेसाई, रमेश नाईक, सदानंद वायंगणकर आदीसह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भाऊसाहेबांनी साधला शाश्वत विकास!
मगो पक्ष हा या मातीतील लोकांचा पक्ष आहे आणि या मये मतदारसंघात मगो पक्षाचे स्थान आजही बळकट आहे. या मतदारसंघाने या पक्षाला चांगलेच प्रेम दिले आहे. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी या राज्याचा शाश्वत विकास घडविताना आणलेले प्रकल्प आणि योजना सरकार पुढे नेत आहे. या सरकारने केलेल्या योजना या लोकांच्या पैशातूनच लोकांना मिळत असून या सरकारने नवीन असे काहीच केलेले नाही. या सरकारमध्ये असलेल्या काही बेशिस्त मंत्र्यांमुळे सरकार बदनाम होत चालले आहे. त्यामुळे येणाऱया निवडणुकीत त्यांना आपला पराभव दिसू लागला आहे. म्हणूनच आज त्यांना मगो पक्षाची आठवण येत आहे. आपल्या नि÷ावंत कार्यकर्त्यांना पायदळी तुडविणाऱया या पक्षाला येणाऱया काळात जनताच दाखवून देणार आहे. असेही सुदिन ढवळीकर यांनी यावेळी म्हटले.
आगामी काळ मगो पक्षाचा : नरेश सावळ
राज्यात सध्या मगो पक्षाला मिळणारा प्रतिसाद पाहता येणारा काळ हा मगो पक्षाचाच असणार असून येणारे सरकारही मगो पक्षाचेच असणार. ती या राज्यासाठी काळाची गरज आहे. या पक्षाकडे सुदिन ढवळीकर यांच्या सारखा निष्कलंक नेता असून ज्यांनी गोव्याचा चौफेर विकास साधला आहे. डिचोली व मये या दोन्ही मतदारसंघात मगोला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रेमेंद्र शेट यांना निवडून आणणे हिच स्व. अनंत शेट यांना खरी श्रध्दांजली ठरणार, असे यावेळी माजी आमदार नरेश सावळ यांनी म्हटले.
मयेत मगो पक्षाची सिंहगर्जना : दिपक ढवळीकर.
गेली 60 वर्षे ज्या पक्षाने आपले अस्तित्व विधानसभेत राखून ठेवले आहे. त्या पक्षाबद्दल वाईट बोलणाऱयांना येणाऱया निवडणुकीत उत्तर मिळणार आहे. आज जे सरकार चालवत आहे, त्यांनी तसेच काँग्रेस पक्षाने मगो पक्षाचे आमदार फोडत पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र आजपर्यंत मगोने राज्यात आपले अस्तित्व राखून ठेवले आहे. आज राज्यात दिल्ली आणि बंगालहून पक्ष आले असून त्यांनी आतापर्यंत केवळ स्क्रॅप नेत्यांनाच प्रवेश दिला आहे. या पक्षाला मये मतदारसंघात एकेकाळी मोठा वाव होता. आजही या मतदारसंघात मगो पक्षाचे खूप चाहते असून मयेत पुन्हा एकदा मगोची सिंहगर्जना सुरू झाली आहे, असे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले.
मगो लोकांच्या हृदयातील पक्ष : जीत आरोलकर
या राज्यात अनेक राष्ट्रीय आणि इतर पक्ष आले, त्यांनी लोकांची दिशाभूल करीत सत्ता मिळविली आणि आज ते लोकांच्या माथ्यावर बसले आहेत. लोकांकडे पहायला त्यांना वेळ नाही. परंतु मगो पक्ष हा सदैव लोकांचे विषय आणि समस्या पुढे घेऊन चालणारा लोकांच्या हृदयातील पक्ष आहे, असा दावा जीत आरोलकर यांनी केला.
यावेळी प्रेमेंद्र शेट यांनी आपल्या स्वागततपर भाषणात मगो पक्षातच आज राज्याचे भविष्य असून येणारे सरकार हे मगो पक्षाचेच असणार आणि त्यात सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री असणार, असा दावा केला. मये मतदारसंघात जीव तोडून काम केलेल्या आपले बंधू स्व. अनंत शेट यांच्यावर भाजप पक्षाने अन्याय आणि अत्याचार केले. पक्षासाठी समर्पित भावनेने काम करणाऱया एका नेत्याची कशी अवहेलना हा पक्ष करू शकतो, याचे एक उदाहरण म्हणजे स्व. अनंत शेट. त्यासाठीच त्या पक्षाकडे पुन्हा न जाता मगो पक्षाकडे जाण्याचा आपण निर्णय घेतला. असेही त्यांनी स्पष्ट पेले.
मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रेमेंद्र शेट यांनी कार्यकर्त्यांसमवेत मगो पक्षात प्रवेश केला. ऍड. नारायण सावंत, प्रसाद कुंडईकर, सदानंद वायंगणकर यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदर धोंड यांनी केले व त्यांनीच आभार मानले.









