मुंबई / प्रतिनिधी
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०, ७९१ किरकोळ मद्य विक्रीसाठी परवानगी मिळालेल्या दुकानांपैकी ५,५६९ परवाना असलेली दुकाने सुरू आहेत. मंगळवार दि. १९ रोजी एका दिवसात अंदाजे ३२, ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. मद्यसेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणालीबाबत संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत आहेत. तोपर्यंत मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निदर्शनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/ निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे.
सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.१,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.








