नागरिकांनी शेती व्यवसायाकडे वळावे : म्हापशात 10 शेतकऱयांचा सन्मान
प्रतिनिधी / म्हापसा
राज्यासाठी प्रतिदिनी 400 टन भाजीची आवश्यकता आहे. ही भाजी आम्ही गोव्याबाहेरून राज्यात आणतो. राज्यात अवघे 10 टनपर्यंत भाजीचे पीक आम्ही काढतो. भाजी राज्यात आणण्यासाठी 30 कोटी रुपये आम्ही शेजारच्या राज्यांना देतो. ही भाजी लागवड गोव्याच्या शेतकऱयांनी केली तर येथील शेतकऱयांना देऊ शकतो. अशी माहिती गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा कृषी मंत्री बाबू कवळेकर यांनी म्हापसा येथे बोलताना दिली. गोव्याच्या नागरिकांनी शेती व्यवसायाकडे वळण्याची आज काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. गोवा कृषी बाझारच्या वतीने यंदा जास्त पीक देणाऱया 10 शेतकरी वर्गांचे पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर चेअरमन दत्तप्रसाद खोलकर, पर्यटन चेअरमन तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर, उपचेअरमन राजेश माणगावकर, संचालक उल्हास अस्नोडकर, सगुण बाणावली, सुशांत हरमलकर, कुसून वळवईकर आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी क्रिस्तिना कास्टेलिना (आसगाव), गेस्पर फर्नांडिस (हणजूण), सदानंद पेडणेकर (पर्रा), अंकुश वारंग (पर्रा), नितेश ताम्हणकर (म्हापसा), दिलीपचंद लोटलीकर (गिरी), पुंडलिक कळंगुटकर (साळगाव), पॅटरिना रॉड्रीगीस (साळगाव), सनील लुईस, सावियो लोबो (सुकूर), वल्लभ फडते (रेवोडा) या दहा शेतकरी बंधूंचा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी खात्याचे संचालक मॅवल आल्फान्सो, विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ जोशी उपस्थित होते.
जलस्त्रोत खात्याचे 327 मोठे बंदर आहेत तर इतर छोटे मिळून राज्यात एकूण 2 हजाराच्या आसपास बंदरे आहेत. या बंदरासाठी छोटे छोटे शेतकऱयांचे गट तयार करून त्यामार्फत जमिनीत पीक काढू शकतो. जलस्त्रोत खाते व कृषी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हे पाऊल पुढे नेणार आहेत. ज्यांच्या शेतीची नुकसानी होते अशा होतकरू शेतकरी अर्थसंकल्पात राज्य सरकारने 5 कोटी रुपयांची शेतकरी आधार निधी म्हणून तरतूद केली आहे असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी स्पष्ट केले.
शेतकऱयांसाठी ई कृषी संपर्क गट तयार केला असून यात मंत्री अधिकारी वर्ग शेतकरी वर्ग यांचा वॉट्सऍप गट करण्यात आला असून याद्वारे एकमेकांच्या समस्यांची देवाण घेवाण केली जाते असे उपमुख्यमंत्री म्हणाले. जेणेकरून संस्था चालविणे चांगले होते. शेतकऱयांमध्ये शेती विषयी क्रांती निर्माण होणे काळाची गरज आहे. आम्ही स्वतःच्या पायावर राज्यात भात शेतीची लागवड करणार तेव्हाच हे राज्य खऱया अर्थाने कृषी प्रदान राज्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोवा कृषी बझारचे चेअरमन दत्ता खोलकर यांनी स्वागत केले व गेल्या वर्षाच्या शेतीच्या पिकाचा आढावा घेत बक्षीसप्राप्त शेतकरी वर्गांचे अभिनंदन केले. संचालक तथा आमदार दयानंद सोपटे यांनी शेतकरी वर्गांनी यापेक्षाही अधिक पीक काढून शेती व्यवसायाकडे आपला कल दाखवावा असे सांगून पुरस्कारप्राप्त शेतकऱयांचे अभिनंदन केले.









