शेती, बागायतीची मोठी नुकसानी आजही पावसाची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
अवकाळी पावसाने काल शुक्रवारी रथसप्तमीदिनी गोव्याला अशरक्षः झोडपून काढले. तिसवाडी, फोंडा, काणकोण, सांखळी या भागात जोरदार पाउस पडला तर सावर्डे, केपे आणि शिरोडा भागात जोरदार पावसाबरोबरच गारांचा वर्षावही झाला. आज शनिवारीही गोव्यातील काही भागात किरकोळ पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्याच्या पडत असलेल्या पावसाने शेती बागायतीची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे.
सलग दुसऱया दिवशी गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. 7 जानेवारी रोजी पडलेल्या पावसानंतर हा फेब्रुवारीमध्ये सलग दोन दिवसांचा पाऊस ठरला.
पावसाचा आम्रवृक्षांच्या मोहोरावर परिणाम
सात जानेवारी रोजी पडलेल्या पावसाचा एवढा विपरित परिणाम झाला की यावर्षी बहुतांश आंब्याचा मोहोरच फुटला नाही. डिसेंबरमध्येही जोरदार पाउस पडल्याने त्याचाही परिणाम आम्रवृक्षांवर झाला. राज्यातील सुमारे 20 टक्के आंब्यांच्या झाडांना मोहोर फुटला व काही भागात कैऱयाही तयार झाल्या खऱया, मात्र दोन दिवस पडलेल्या पावसाचा पुन्हा या झाडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
काजू बागायतदारही धास्तावले
काजू उत्पादक देखील या पावसामुळे धास्तावलेले आहेत. हवामान खात्याने आजही पावसाची शक्यता व्यक्त केल्याने काही भागात आज पाऊस पडून जाईल. सध्याचे भारतीय खंडातील वातावरण पाहता पुढील काही दिवसांत पावसाचे पुनरागमन होण्याचीच शक्यता आहे.
केपे, सावर्डे, शिरोडा भागात गारांचा पाऊस
गोव्याच्या काही भागात गुरुवारी पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी काही भागात तुरळक पाऊस झाला. दुपारी उष्णतामानात थोडी वाढ झाली व त्यानंतर काणकोण, सांगे, केपे, सावर्डे इत्यादी भागात जोरदार पाऊस झाला. केपे, सावर्डे आणि शिरोडा भागात पावसाबरोबर चक्क गाराही पडल्या. गोव्यात सहसा गारा पडत नव्हत्या. परंतु अलिकडच्या काळात गोव्यात गारा पडण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक भागात रथसप्तमी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम चालू असतानाच पावसाने हजेरी लावली. शिरोडामध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर दुपारी फोंडा तालुक्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी सांखळी, डिचोली, म्हापसा, पेडणे व पणजी, ओल्डगोवा कुंभारजुवे अन्य भागांतही बराचवेळ पाऊस पडला.
अनेकजण रेनकोट अभावी अडकले
सायंकाळी पडलेल्या या पावसामुळे अनेकजण रेनकोट अभावी अडकून पडले तर अनेक जण ऐन कार्यालये सुटतानाच पडलेल्या पावसाने अडकून पडले. सायंकाळी 7 नंतर पावसाने पणजीत विश्रांती घेतली परंतु काही भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता.
आजही राज्यात सर्वत्र तुरळक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने भाजीपाला उत्पादक तसेच आंबा, काजू उत्पादकांची धांदल उडाली आहे व ते अडचणीत आले आहेत.









